मिडकॅप, स्मॉलकॅप फंडाचे काय करावे?

mutual fund
mutual fund

प्रत्येक माणूस, मग तो नोकरी करणारा असो अथवा व्यवसाय करणारा, दर महिन्याला काही ना काही उत्पन्न कमावत असतो. होणाऱ्या कमाईतून आपले गरजेचे खर्च भागल्यावर प्रत्येक माणसाकडे दर महिन्याला काही रक्कम शिल्लक राहते. शिल्लक राहिलेली ही रक्कम कुठे ना कुठेतरी गुंतवायची असते. ही गुंतवणूक प्रामुख्याने पारंपरिक बॅंक एफडी, पोस्टाच्या योजना, सोने, आयुर्विमा (हा खरे तर गुंतवणुकीचा प्रकार नव्हे; पण बरेच जण याकडे गुंतवणुकीचा प्रकार म्हणून बघतात.) यांसारख्या गुंतवणूक प्रकारात केली जाते. पण, गेल्या काही वर्षांत या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा हा महागाईदरापेक्षा जास्त पडताना दिसत नाही. म्हणजे जर या पारंपरिक गुंतवणुकीच्या प्रकारात दीर्घ कालावधीसाठी जर गुंतवणूक करत गेलो, तर एका मोठ्या कालावधीनंतर त्यातून मिळणारा परतावा हा खूपच कमी असतो आणि मग आर्थिक अडचणींना सुरवात होते. पण, याच गेल्या २५ ते ३० वर्षांच्या कालावधीत शेअर बाजाराच्या निर्देशांकाने महागाईच्या दरावर मात करून परतावा दिला आहे. म्हणजे जेव्हा दीर्घ कालावधीच्या गुंतवणुकीचा विषय येतो, तेव्हा नक्कीच ‘इक्विटी मार्केट’मध्ये गुंतवणुकीशिवाय दुसरा पर्याय नाही आणि त्यातल्या त्यात इक्विटी मुच्युअल फंडातील ‘एसआयपी’ हा सर्वोत्तम पर्याय ठरतो.

‘निगेटिव्ह रिटर्न्स’मुळे चिंता 
आता इक्विटी मुच्युअल फंडातील गुंतवणूक हा उत्तम पर्याय आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. या गुंतवणूक प्रकाराबद्दलची जागरूकता गेल्या ३-४ वर्षांत अधिक झाली आहे. बऱ्याच लोकांनी यामध्ये गुंतवणूक चालूही केली असेल. ही गुंतवणूक करताना आपण लार्जकॅप, मिडकॅप, स्मॉलकॅप फंडांत विभागून करीत असतो. ही विभागणी अतिशय योग्य आहे. सुरवातीच्या काही काळात गुंतवणूकदारांना असे जाणवले असेल, की मिडकॅप, स्मॉलकॅप फंडात खूप चांगला परतावा मिळतो. पण गेल्या दोन वर्षांत गुंतवणूकदारांना असेही जाणवले असेल, की तेच मिडकॅप आणि स्मॉलकॅप फंड सर्वांत कमी किंवा ‘निगेटिव्ह’ परतावा देत आहेत. यामुळे गुंतवणूकदारांच्या मनात आता असा विचार नक्कीच येत असेल, की ही मिडकॅप, स्मॉलकॅप फंडात केलेली गुंतवणूक बरोबर आहे का? का यातील गुंतवणूक येईल त्या मूल्यांकनात विकून सरळ ते पैसे मल्टीकॅप अथवा लार्जकॅप फंडात ठेवावेत? 

...तर गुंतवणूकदारांनो हे असे करू नये, असे माझे ठाम मत आहे. आपली मुच्युअल फंडातील गुंतवणूक ही लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप या तिन्ही प्रकारच्या फंडांत समान असावी. गेल्या दोन वर्षांत शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. विशेषतः मिड आणि स्मॉल कॅपमध्ये लार्जकॅपच्या तुलनेत जास्त घसरण बघायला मिळाली. पण ही घसरण म्हणजे ‘बुल मार्केट’मधील एक ‘करेक्‍टिव फेज’ आहे. गेल्या २५ ते ३० वर्षांत अशा प्रकारचे भरपूर चढ-उतार शेअर बाजारात पाहायला मिळाले आहेत. या वर्षांमध्ये तेजीची वर्षे कमी आणि मंदीची वर्षेच जास्त होती. मंदीची वर्षे म्हणजे हर्षद मेहता अथवा केतन पारेख घोटाळा उघडकीस आल्यानंतरची बाजारातील पडझड, सर्वांना ज्ञात असलेली २००८ मधील मोठी घसरण वगैरे. तरीसुद्धा काही चांगल्या मिडकॅप फंडात केलेली गुंतवणूक जर तशीच ठेवली असती, तर २०१९ मध्ये साधारणपणे वार्षिक सरासरी परतावा १८ ते १९ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मिळाला असता. याची काही उदाहरणे सोबतच्या चौकटीत दिली आहेत.

अशी अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतील, की जर दीर्घ कालावधीसाठी मिड, स्मॉलकॅप फंडांत गुंतवणूक केली, तर हे फंड शेअर बाजाराच्या निर्देशांकाच्या परताव्यापेक्षा जास्त परतावा देतात. तेव्हा आता जरी मिड, स्मॉलकॅप फंडांतील गुंतवणूक गेल्या दोन वर्षांपासून ‘निगेटिव्ह’मध्ये दिसत असले तरी, यातून बाहेर पडू नये. आपला मुच्युअल फंड पोर्टफोलिओ हा लार्जकॅप, मिडकॅप, स्मॉलकॅप या सर्वांमध्ये समान विभागलेला असावा, जेणेकरून जोखीमही विभागली जाते आणि साऱ्या प्रकारची फळे चाखायला मिळू शकतात.

म्युच्युअल फंडात आता १०० रुपयांची गुंतवणूकही शक्य!
मजूर, शेतकरी, कष्टकरी अशा सर्वसामान्य गुंतवणूकदारांनादेखील म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता यावी, यासाठी म्युच्युअल फंड कंपन्यांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. यातील गुंतवणुकीची रक्कम अगदी १०० रुपयांवर आणली आहे. आदित्य बिर्ला सनलाइफ म्युच्युअल फंड आणि रिलायन्स निप्पॉन म्युच्युअल फंडाने हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. अलीकडेच रिलायन्स निप्पॉन म्युच्युअल फंडाने आपल्या मल्टीकॅप फंड व ग्रोथ फंडामध्ये एकरकमी गुंतवणुकीसाठी किमान गुंतवणुकीची रक्कम ५००० रुपयांवरून १०० रुपये केली. विशेष म्हणजे २९ ऑगस्टपासूनच याची अंमलबजावणी करण्यात आली.  आदित्य बिर्ला सनलाइफनेदेखील याअगोदरच ही योजना अमलात आणली आहे. यामुळे आता सामान्यातील सामान्य माणसालाही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे शक्‍य होणार आहे.

(डिस्क्‍लेमर - म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजाराच्या आधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेशी संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.  यासाठी तज्ज्ञ सल्लागाराची मदत घेणे फायदेशीर ठरते.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com