'जीएसटी’तून वगळण्याची बिस्कीट उद्योगाची मागणी

वृत्तसंस्था
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

मुंबई: वाजवी दरात जास्त पोषणमूल्ये देणाऱ्या गटातील बिस्किटांना प्रस्तावित वस्तू आणि सेवा करातून (जीएसटी) पूर्णपणे वगळण्याची मागणी बिस्कीट मॅन्युफॅक्‍चर्स वेलफेअर असोसिएशनने केली आहे.

मुंबई: वाजवी दरात जास्त पोषणमूल्ये देणाऱ्या गटातील बिस्किटांना प्रस्तावित वस्तू आणि सेवा करातून (जीएसटी) पूर्णपणे वगळण्याची मागणी बिस्कीट मॅन्युफॅक्‍चर्स वेलफेअर असोसिएशनने केली आहे.

देशात वाजवी दरात जास्त पोषणमूल्ये देणाऱ्या गटातील बिस्किटांची 36 हजार कोटींची उलाढाल असून, सहाशेहून अधिक बिस्कीट उत्पादक आहेत. स्वच्छ आणि सुरक्षित पद्धतीने बिस्किटांची निर्मिती करून त्यांची दोन ते पाच रुपयांच्या पाकिटांमध्ये विक्री केली जाते. अल्प उत्पन्न गटातील ग्राहकांकडून या बिस्किटांचे सेवन केले जाते. प्रस्तावित जीएसटीमध्ये या बिस्किटांवर कर लावल्यास बिस्किटांच्या किंमती वाढतील. त्यामुळे जीएसटीतून या बिस्किटांना पूर्णपणे वगळण्याची मागणी असोसिएशनचे उपाध्यक्ष मयांक शहा यांनी केली.

वर्षभरात मैदा, साखर आणि खाद्यतेलाच्या किंमतींत जवळपास 62 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. त्यामुळे नफ्यावर परिणाम झाला आहे. कच्चा माल महागला असला तरी गेल्या वर्षात बिस्कीट उद्योगक्षेत्राने 13 हजार 300 कोटींची कृषिमालाची खरेदी केली होती. एकूण उलाढालीनंतर सरकारला या उद्योगातून 3 हजार 75 कोटींचा महसूल कर स्वरूपात मिळाला होता. ग्लुकोज बिस्कीटच्या एक किलो पाकिटाची किंमत 70 रुपये असून, त्यावर 7 रुपये 21 पैसे कर आकारला जातो. कराची रक्कम नफ्याच्या तुलनेत अधिक असल्याने अनेक उत्पादकांनी उत्पादन थांबवण्याचा विचार सुरू केला असल्याचे शहा यांनी सांगितले.

Web Title: Manufacturers seek zero GST on low price biscuits