आशियातील तेजीची रसद

आशियातील तेजीची रसद

विक्रम प्रस्थापित करत शेअर बाजाराचे दोन्हीही निर्देशांक मागील आठवड्यात आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वोच्च भावावर पोहोचले. रुपयातील तेजी, आशिया बाजारातील उत्साही वातावरण, स्थानिक संस्थांची जोरदार खरेदी आणि त्याच वेळी इतर गुंतवणुकीतील (उदा. सोने) मरगळ या सगळ्याचा एकत्रित परिणाम शेअर बाजारातील या तेजीला रसद पुरवत आहे.

गेल्या आठवड्यात मुंबई निर्देशांक १.६ टक्‍क्‍यांनी (३३,६८५); तर निफ्टी १.३ टक्‍क्‍यांनी (१०,४५२) वाढले. शुक्रवारची एका दिवसाची वाढ त्यापैकी ०.३ टक्के होती. निर्देशांकातील भारती एअरटेल (११ टक्के), ॲक्‍सिस बॅंक (११ टक्के), आयसीआयसीआय बॅंक (५ टक्के), ल्युपिन (५ टक्के), एचडीएफसी (५ टक्के) यांची वाढीत प्रमुख भागीदारी होती. मिडकॅप वर्गवारीतील, डिव्हीज लॅब (२० टक्के), बायोकॉन (१४ टक्के), युनायटेड ब्रेअरीज (१३ टक्के), श्रीराम ट्रान्स्पोर्ट (१२ टक्के) वाढीसाठीचे प्रमुख घटक आहेत.

याच वर्गावरील जे शेअर्स घटले ते मात्र घटले ते फक्त ४ ते ६ टक्के. निर्देशांकातील महिंद्र महिंद्र (४ टक्के), हिरो मोटर (३ टक्के), टाटा स्टील (२ टक्के), इन्फोसिस (२ टक्के), बजाज ॲटो (२ टक्के); तर मिडकॅपमधील युनायटेड फॉस्फरस (६ टक्के), जेएसडब्ल्यू एनर्जी (५ टक्के), बर्जर पेंट (४ टक्के), इंडिया बुल हाऊसिंग (३ टक्के) व अशोक लॅंड (३ टक्के). वाढ सरकारी १० ते १५ टक्के, तर घट मात्र जेमतेम ४ टक्के ते ६ टक्के. याचा अर्थ अजूनही अंतस्थ प्रवाह (अंडर करंट) वाढीला अनुकूल असून तो जोरदार आहे, असे दिसते.

अर्थात कोरियन माथेफिरूचे ढग घोंघावत आहेत आणि त्यातून काही अघटित घडलं तर... पण नकोच त्यावर विचार करायला! गेले वर्षभर खचून राहिलेला (डाऊन ट्रॉडन) फार्मा सेक्‍टर जरा तेजीची चुणूक दाखवून गेला. सिपला तर वर्षातील सर्वोच्च भावाच्या (६४८/६४०) जवळ बंद झाला. ऑरोफार्माही वधारला (७८८/८०४). बायोकॉन, ल्युपिन, सनफार्मा, डाबर, ग्लॅक्‍सो थोडेफार प्रकाशात राहिले. २०१८ वर्ष फार्माचे ठरू शकते.

इथेनॉलचे दर किंचितसे वाढवल्यामुळे साखर कंपन्या (महत्त्वाची, दालमिया भारत) माफक वाढल्या. ‘प्राज’पण वधारला. अरविंद (४४०), भारत फोर्ज (७०५), डीएचएपएल, (६६५), ग्राफाईट (५७५), ग्रासीम (१२८३), मेघ (१२१), पेज (२१,०००), सिंफनी (१५७२), टायटन (६६०) या कंपन्या गेल्या आठवड्यात मजबूत सिद्ध झाल्या.

टायटन अजूनही वधारू शकतो. लार्सन टुब्रो, मोतीलाल ओसवाल यांचे सहामाही अहवाल एव्हाना जाहीर झाले असतील. त्यांचेही आकर्षण या आठवड्यातून राहू शकते. कोल्हापूर परिसरातील मेनन पिस्टन डार्क हॉर्स ठरू शकतो!

आयपीओ आघाडी नेहमीप्रमाणेच मजबूत राहिली आहे. एक इश्‍यू संपला की पाठोपाठ दुसरा रांगेत उभाच असतो. इथं सरसकट अर्ज करण्यात अर्थ नाही. त्यापेक्षा ज्या इश्‍यूंनी गेल्या वर्षभरात चांगला मोबदला दिला आहे, उदा. आरबीएल, डी मार्ट, हडको, सीडीएसआय, डिस्कॉन टेक्‍नॉलॉजी यावर लक्ष ठेवून जर ते खाली आले (किंबहुना मार्केट खाली येताना ते खाली येतातच) तर घेणं उचित.

नवीन आयपीओत न्यू इंडिया जेमतेम भरलाय. लहान गुंतवणूकदारांना तर मागेल तेवढेच शेअर मिळणार आहेत. त्यामुळे त्यात लिस्टिंग बेनिफिट काय होणार? महिंद्र लॉजिस्टिक यात (मिळाल्यास) बरा फायदा व्हावा (१० टक्के प्रीमियम - ग्रे मार्केट).

‘खादिम’ उत्तर भारतातील पादत्राणाची कंपनी. याचा इश्‍यू सुरू आहे. त्याला ५ ते १० टक्के प्रीमियम बोलला जातो. एचडीएफसी स्टॅंडर्ड लाइफ इन्शुरन्स २९० रु. शेअर येत आहे. त्याला १८ ते २० रु. प्रीमियम दिसतो.

गेल्या दिवाळीपासून यंदाच्या दिवाळीपर्यंत शेअर बाजाराने मजबूत मोबदला दिला आहे. बॅंकांच्या घसरत्या मुदत ठेवीच्या व्याजाच्या तुलनेत तर तो अधिकच आकर्षक आहे. पण सर्वसामान्य गुंतवणूकदार बॅंक, पोस्ट, पतसंस्था यापुढं जाऊ इच्छित नाही. शेअर बाजाराविषयी भीती, अज्ञान आणि साधनसामग्री (इन्फ्रास्ट्रक्‍चर) याचा अभाव अशी अनेक कारणं शेअर बाजाराकडं न वळण्यासाठी आहेत. सर्वसामान्य बौद्धिक क्षमता असणारी कोणीही व्यक्ती शेअर बाजाराच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकते. स्वतःच्या साधनसामग्रीला वाढायला संधी उपलब्ध न करून देणं, हा खरं तर घोर अपराधच म्हणावा लागेल. गेला बाजार म्युच्युअल फंड तरी प्रत्येकाला अंगिकारावा असं कळकळीचं आवाहन!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com