‘‘देणाऱ्याचे हात घ्यावे’’

‘‘देणाऱ्याचे हात घ्यावे’’

‘कर्मण्येवाधिकारस्ते, मा फलेषु कदाचन’
श्रीमद्‌भगवद्‌गीता अध्याय दुसरा श्‍लोक ४७ मध्ये म्हटल्याप्रमाणे ‘तू कर्म कर, तू ते केलंच पाहिजेस; परंतु त्याच्या फलावर, त्याच्या लाभावर आसक्ती ठेवू नकोस.’ भारतीय संस्कृतीतील हे तत्त्वज्ञान एकमेवाद्वितीय आहे.
त्याचं उच्चारण सोपं आहे; पण आचरण तितकेच अवघड आहे. समाजातील निदान काही व्यक्ती तरी ते अंगीकारतात आणि त्या श्‍लोकाचं मूल्य अबाधित राखतात.

गेल्याच आठवड्यात भारतीय काॅर्पोरेट जगतातल्या एका दाम्पत्याने आपली निम्मी मालमत्ता (कोट्यवधीची) समाजाला परत करण्याची शपथ वाहिली. नंदन निलेकणी, इन्फोसिसच्या संस्थापक सदस्यांपैकी एक, जे नुकतेच इन्फोसिसच्या कसोटीच्या वेळी नॉन एक्‍झिक्‍युटिव्ह चेअरमन म्हणून इन्फोसिसमध्ये परत आले. त्यांनी आणि त्यांच्या पत्नी रोहिणी हे ‘देतं व्हा!’ व्रत स्वीकारत बिल गेटस्‌ आणि वॉरन बफे यांच्या दिंडीत सामील झाले. जगातल्या २१ देशांमधील १७१ दानशूर कर्णांच्या या यादीत भारतातील विप्रोचे अझीम प्रेमजी, बायोकॉनच्या किरण मुजुमदार-शॉ, शोभा डेव्हलपरचे पीएनसी मेनन, यानंतर निलेकणी दाम्पत्याचा चौथा क्रमांक येतो.
कदाचित यातून स्फूर्ती घेऊन भारती एअरटेलच्या मित्तल कुटुंबीयांनीही स्वतःची ७००० कोटींची मिळकत समाजाच्या कल्याणासाठी सुपूर्द केली आहे.

या सर्वांच्या प्रति आपण नतमस्तक झालं पाहिजे आणि आपापल्या परीनं भले खारीचा वाटा असेल, उचलला पाहिजे! आणि समाजाकडून आलेलं, समाजाला परत करण्याची वृत्ती ठेवली पाहिजे. शेअर बाजार वर-खाली जात राहतो. जात राहणार. पण निलेकणींच्या दातृत्वाच्या बातमीनं मी जास्त भारावलो गेलो. त्यामुळं त्याचा उल्लेख अग्रभागी केला आहे. असो.

गेल्या आठवड्यात ज्या थ्री एमचा उल्लेख (मूडी, मोदी, मनी) सतत होत होता, त्याचे दृश्‍य परिणाम म्हणजे बाजार सतत सातही दिवस वरच्या स्तरावर राहिला. सेन्सेक्‍स ३३६ अंश तर निप्टी १०६ अंश वर राहिले व अनुक्रमे ३३६७५ व १०,३८९ वर बंद झाले. स्थानिक, वित्तीय संस्था यांची जोरदार खरेदी आणि इतर आशियाई देशातील बाजारांतील तेजी; पण देशी तेजीला कारणीभूत होती.

निफ्टी ५० तील ऑरोफार्मा (३.२५ टक्के) गेल, (१.८६ टक्के) व इन्फोसिस (१.६९ टक्के) हे शुक्रवारी सर्वात जास्त वर होते. मात्र व्हॉल्यूममध्ये इन्फोसिस (९४० कोटी), रिलायन्स (६०९) कोटी) व स्टेट बॅंक, टीसीएस, मारुती हे नेहमीचे बिनीचे कलाकार आघाडी सांभाळून होते. येत्या आठवड्यात इन्फोसिस व विप्रोचे बायबॅक खळबळ माजवणार आहेत. स्वीकृती गुणोत्तर इन्फोसिसचे कमी राहिले आहे. त्यामानाने विप्रोचे चांगले आहे. सर्वांना ई-मेल आले आहेत. जास्तसाठी नक्की अर्ज करावेत.
पाठोपाठ स्वराज्य इंजिननेही शेअर बायबॅकचा इरादा जाहीर केला आहे. तपशील येणे बाकी आहे. एचडीएफसी स्टॅंडर्ड लाईफनं मार्केटला चकवा दिला. सूचिबद्धतेनंतर दोन-तीन दिवस जेमतेम वाढ दाखवणारा हा समभाग चौथ्या-पाचव्या दिवशी एका दिवसात २० टक्केहून अधिक वाढला व एकूण वाढ ४५ टक्के नोंदवली. ‘पद्मावती’च्या प्रसारणावर तहकुबी आली तर न्यू इंडिया इन्शुरन्सला १५० कोटींपर्यंत फटका बसू शकतो.
महिंद्र, महिंद्रा इलेक्‍ट्रिक कार्स तर आघाडीवर आहे. शिवाय एकास एक बोनसही जाहीर झाला आहे. त्यामुळे दीर्घ मुदतीने गुंतवणुकीसाठी शेअर बरा वाटतो.

डीएसके शेअरला गेल्या आठवड्यात रोज वरचे सर्किट लागत होते. डीएसकेसमोरील अडचणी (कदाचित?) सुटत आल्या असाव्यात. हा डार्क हॉर्स ठरू शकतो. पण सांभाळून. स्टॉप लॉससह विचार करा.

मेनन या कोल्हापूरच्या ग्रुपमध्ये जोरदार तेजी दिसत आहे. एचडीएफसी हाऊसिंग ऑपार्च्युनिटी फंड महिनाअखेरपर्यंत खुला आहे. हाऊसिंग थीम घेऊन आलेला हा फंड मोदी सरकारच्या परवडणाऱ्या घराच्या धोरणाचा तसेच एचडीएफसी ब्रॅंडचा फायदा मिळवत दीर्घ मुदतीसाठी असल्याने चांगला परतावा देऊ शकतो. जरूर यात गुंतवणूक करा!
डीएलएफ, टायटन, प्राज, अशोक लेलॅंड, सिंडिकेट बॅंक, ज्युविलंट फूड यामध्येही अल्प मुदतीसाठी तेजी संभवते.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com