मुकेश अंबानी आता जगातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 8 August 2020

रिलायन्स इंडस्ट्रीचे (Reliance Industries Ltd.) प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी युरोपातील सर्वात श्रीमंत व्यक्तीला मागे टाकत आता जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

नवी दिल्ली- रिलायन्स इंडस्ट्रीचे (Reliance Industries Ltd.) प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी युरोपातील सर्वात श्रीमंत व्यक्तीला मागे टाकत आता जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. मुकेश अंबानी यांची संपत्ती यावर्षी 22 अब्ज डॉलरने वाढून 80.6 अब्ज डॉलर झाली आहे. ब्लुमबर्ग बिलिनियर निर्देशांकातून ही माहिती समोर आली आहे. 

अयोध्येत सुन्नी वक्फ बोर्ड उभारणार हॉस्पिटल; भूमीपूजनाला योगी आदित्यनाथांना...

मुकेश अंबानी यांनी फ्रान्समधील अब्जाधीश बर्नार्ड अर्नाल्ट (Bernard Arnault) यांना मागे टाकले आहे. LVMH Moet Hennessy Louis Vuitton SE चे प्रमुख असलेले बर्नार्ड अर्नाल्ट कोरोना महामारीच्या काळात मोठ्या संकटात आले आहेत. त्यांच्या कंपनीच्या शेअर्सची किंमत यावर्षी कमी झाली आहे. 

मुकेश अंबानी यांनी यावर्षी अनेक अब्जाधीशांना मागे टाकले आहे. टेस्लाचे प्रमुख इलोन मस्क (Elon Musk), अल्फाबेट इंकचे सहसंस्थापक सर्जी ब्रीन (Sergey Brin) आणि लेरी पेज (Larry Page) आणि वॉरेन बफेट (Warren Buffett)यांचा यात समावेश होतो. 

अंबानी यांनी आपले लक्ष आता ई-कॉमर्स कंपन्यांकडे वळवले आहे. अनेक टेक कंपन्या जगातील दुसऱ्या क्रमांकाशी लोकसंख्या असलेल्या भारतात डिजिटल व्यवसाय वाढवू पाहात आहेत. गूगलने मागील महिन्यात केलेल्या घोषणानुसार कंपनी भारतात 10 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. LVMH चे शेअर घसरल्याने यावर्षी बर्नार्ड यांना मोठा फटका बसला आहे. 500 श्रीमतांच्या यादीत सर्वाधिक नुकसान त्यांना झालं आहे. त्यांची संपत्ती 25 अब्ज डॉलरने घसरुन 80 अब्ज डॉलर झाली आहे. 

केरळ विमान दुर्घटनेतील मृतांचा आला कोविड-19 रिपोर्ट

दुसरीकडे अमेरिकेच्या दिग्गज तंत्रज्ञान कंपन्यांना आणि त्यांच्या संस्थापकांना कोरोना संकट आणि टाळेबंदीच्या काळात मोठा फायदा होताना दिसत आहे. कोरोना महामारीच्या काळात तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था वेगाने तळाला जात असताना मार्क झुकरबर्ग यांच्या संपत्तीत 22 अब्ज डॉलरची, तर जेफ बेझोस यांच्या संपत्तीत 75 अब्ज डॉलरने वाढ झाल्याचं ब्लुमबर्ने सांगितलं आहे. 

फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांचा 100 अब्ज डॉलरपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या उद्योगपतींच्या क्लबमध्ये समावेश झाला आहे.  36 वर्षाचे मार्क झुकरबर्ग आता दिग्गज अमेझॉन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत. 100 अरब डॉलर क्लबमध्ये  जगात केवळ तीन व्यक्ती आहेत. 

(edited by-kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mukesh Ambani Now World's 4th Richest Person