गुंतवणुकीच्या क्षेत्रात ‘टीडी-आरडी’ ही जोडी ‘सुपरहिट’

investment
investment

कोरोना व्हायरसच्या निमित्ताने शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आणि सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा घबराट निर्माण झाली. त्यामुळे शेअर बाजार, म्युच्युअल फंड अशा जोखमीच्या गुंतवणुका केलेली मंडळीदेखील फिक्‍स्ड डिपॉझिट (एफडी) सारख्या पारंपरिक पर्यायाचा पुन्हा विचार करू लागली आहे. मात्र, ‘बॅंक एफडी’ऐवजी पोस्टातील टर्म डिपॉझिटचा (टीडी) पर्याय लोकप्रिय होताना दिसत आहे आणि त्याला कारण अर्थातच बॅंकांपेक्षा पोस्टात असलेला जास्तीचा व्याजदर!

सध्या स्टेट बॅंकेसारख्या सर्वांत मोठ्या राष्ट्रीयीकृत बॅंकेत पाच वर्षांच्या ‘एफडी’वर सध्या ६ टक्के व्याज दिले आहे, तर तेवढ्याच मुदतीच्या पोस्टाच्या ‘टीडी’वर ७.७ टक्के (तिमाही चक्रवाढीने) आहे. याचा वार्षिक परतावा ७.९ टक्‍क्‍यांवर जातो. जवळजवळ दोन टक्‍क्‍यांचा (१.९ टक्के) फरक असल्याने अनेकांचा बॅंकांकडून पोस्टाकडे कल वाढला आहे. ‘टीडी’त ठेवल्या जाणाऱ्या गुंतवणुकीवर दरवर्षी व्याज दिले जाते. या व्याजाची लगेच गरज नसेल तर ते पोस्टातीलच रिकरिंग खात्यात (आरडी) वळवले जात आहे. ‘आरडी’वर सध्या ७.२ टक्के दराने व्याज आहे. थोडक्‍यात, व्याजावर व्याज मिळत असल्याने परतावाही वाढत आहे. दोन्ही योजनांची सांगड घातली आणि पाच वर्षांचा एकत्रित विचार केला, तर मिळणारा परतावा ९.५४ टक्‍क्‍यांपर्यंत जातो. त्यामुळे गुंतवणुकीच्या क्षेत्रात ‘टीडी-आरडी’ ही जोडी ‘सुपरहिट’ ठरताना दिसत आहे.

गुंतवणूकमर्यादा नाही : पोस्टातील मंथली इन्कम स्कीमला (एमआयएस) जशी गुंतवणूक रकमेची मर्यादा आहे, तशी कोणतीही मर्यादा ‘टीडी’ आणि ‘आरडी’ला नसल्याने या योजनांमध्ये कितीही रक्कम गुंतविता येते, त्यामुळे भक्कम सुरक्षितता आणि किफायतशीर परताव्याची अपेक्षा असलेला मोठा वर्ग पोस्टाच्या या ‘पॉप्युलर कॉम्बिनेशन’चा लाभ घेताना दिसत आहे. ‘टीडी’ आणि ‘आरडी’ या दोन्ही योजनांच्या व्याजातून सध्यातरी पोस्टाकडून उद्‌गम करकपात (टीडीएस) केली जात नाही. असे असले तरी हे व्याज किंवा मिळणारा एकूण परतावा हा करपात्र असतो. संबंधित गुंतवणूकदाराच्या ‘टॅक्‍स स्लॅब’नुसार हे उत्पन्न करपात्र ठरते, हे लक्षात घेतले पाहिजे.

नक्की किती पैसे मिळतात : पाच लाख रुपये ‘टीडी’त गुंतविल्यास दरवर्षी रु. ३९,६२५ मिळतात. (पाच वर्षांचे एकूण व्याज रु. १,९८,१२५ होते.) ‘टीडी’वर दरवर्षी मिळणाऱ्या व्याजाची रक्कम ‘आरडी’त गुंतवत गेल्यास मुदतीनंतर त्याचे रु. २,३८,६२५ होतात. फक्त दोन्ही योजना समांतर चालण्यासाठी आणि एकाचवेळी ‘मॅच्युअर’ होण्यासाठी पहिल्या वर्षी ‘आरडी’मध्ये स्वतःकडील पैसे गुंतवावे लागतात. अर्थात, ‘टीडी’चे पाचव्या वर्षाचे व्याज शेवटी मिळतेच, त्यामुळे पहिल्या वर्षी ‘आरडी’मध्ये आपण भरलेल्या पैशांची भरपाई होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com