"मनी मेकिंग आयडिया'ची कल्पना! 

मुकुंद लेले 
Monday, 27 April 2020

काहीजण "वर्क फ्रॉम होम'करून आपापल्या कामात व्यग्र आहेत,तर काहीजणांना नक्की काय करावे,हे सुचत नाहीये.अर्थचक्र थांबल्याने काहींना नोकरी-धंद्याची चिंता सतावतेय,तर काहींना सॅलरी-कटमुळे पैशाची चणचण भासतेय

मध्यंतरी एक सिनेमा आला होता- "आयडियाची कल्पना'! आज त्याची आठवण होण्याचे कारण अर्थातच लॉकडाउन! लॉकडाउनमुळे सध्या अनेक व्यवहार, उद्योग-व्यवसाय थंडावले आहेत. "कोरोना'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या घरीच राहण्याचा सल्ला दिला जातोय आणि तो बरोबरही आहे. काहीजण "वर्क फ्रॉम होम' करून आपापल्या कामात व्यग्र आहेत, तर काहीजणांना नक्की काय करावे, हे सुचत नाहीये. अर्थचक्र थांबल्याने काहींना नोकरी-धंद्याची चिंता सतावतेय, तर काहींना सॅलरी-कटमुळे पैशाची चणचण भासतेय. अजून एक आठवडा लॉकडाउन चालणार असल्यामुळे घरीतच थांबावे लागणार आहे. या अनपेक्षित "ब्रेक-कम घरी राहण्याचा' सदुपयोग कसा करता येईल, याचा विचार करायला हवा. आपल्यात दडलेल्या कलागुणांना, कौशल्याला बाहेर काढण्याची अथवा काही कौशल्ये विकसित करण्याची हीच वेळ आहे. यानिमित्ताने पायाभरणी करून भविष्यातील अर्थार्जनाची नवी वाट सापडू शकेल. अशाच काही "मनी मेकिंग आयडियाज'वर एक नजर टाकूया. अर्थात यातून झटपट पैसे मिळण्याची अपेक्षा न धरता दीर्घकाळातील संधी म्हणूनच पाहावे लागेल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

- अनेकांकडे ज्ञान आणि शिकविण्याचे कौशल्य असते. पण वेगळ्या प्रकारच्या क्षेत्रात व्यग्र असल्याने या कौशल्याला पुरेसा वाव मिळालेला नसतो. सध्याच्या काळात ऑनलाईन ट्युशन्स घेऊन कमाई करता येऊ शकते. शाळा-कॉलेजचा अभ्यासक्रम असो किंवा विमा-गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करण्यासाठीचा कोर्स असो; अनेकांना घरबसल्या या गोष्टी करता येऊ शकतात. अगदी कला-संगीताचीही ऑनलाईन ट्युशन्स घेता येते. यासाठी सोशल मीडियाचा चांगला वापर करता येऊ शकतो. स्वतःचे "यू-ट्यूब चॅनेल' सुरू करून; तसेच "फेसबुक पेज' बनवून याची सुरवात करता येऊ शकेल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- आपल्यात मार्केटिंगचे कौशल्य असेल तर "सकाळ मनी'सारख्या उपक्रमाशी जोडून तुम्ही म्युच्युअल फंड वा इन्शुरन्स ऍडव्हायझर म्हणून काम करु शकता. विविध प्रकारची कर्जे लोकांना मिळवून देण्यासाठी "डायरेक्‍ट सेलिंग एजंट' (डीएसए) म्हणूनही सहभागी होऊ शकता. यासाठी आवश्‍यक ते प्रशिक्षण तुम्हाला घ्यावे लागेल. 

- "ब्लॉग लेखना'ला सुरवात करून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी असते. आज अनेक जण आपापल्या स्पेशलाईज्ड विषयात दर्जेदार लेखन करून "ब्लॉगर' म्हणून प्रसिद्ध आहेत. तुमचे "फॉलोअर्स' वाढत गेल्यास भविष्यात अर्थार्जनाची संधी प्राप्त होऊ शकते. 

- हस्तकला आणि पेंटिंग्ज हाही एक पैसे मिळवून देणारा छंद आहे. फावल्या वेळेत अशा कलाकृती घडविल्यास त्याला बाजारात चांगले मूल्य मिळू शकते. छंद-आवड जोपासत समाधान मिळविण्याबरोबरच अर्थार्जनही होऊ शकते. 

- रोजच्या व्यापातून स्वतंत्रपणे लेखन करायला अनेकांना वेळ मिळत नाही. पण आपल्यात दडलेल्या लेखकाला चाचपून पाहता आले तर नवी संधी निर्माण होऊ शकते. लेखनाचे वेगळेवेगळे प्रकार आजमावून पाहिले आणि त्यात कौशल्य दिसून आले तर कथालेखन, पटकथालेखन, संवादलेखन या क्षेत्रात नवी वाट चोखाळता येऊ शकते. 

- भाषांतर हे देखील पैसे मिळवून देणारे एक स्वतंत्र क्षेत्र आहे. आज वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांना वेगवेगळ्या भाषांमधून मजकुराचे भाषांतर करून हवे असते. भाषाकौशल्य विकसित केल्यास घरबसल्या पैसे मिळण्याची सोय होऊ शकते. "मेडिकल ट्रान्सक्रिप्शन' हेही असेच एक वेगळ्या कौशल्याचे क्षेत्र आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mukund lele article Money Making Idea