जिओ दिवाळीत देणार आणखी एक गिफ्ट !

पीटीआय
गुरुवार, 1 जून 2017

एअरटेलही तयारीत
जिओ फायबरला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेत भारती एअरटेलनेदेखील काही दिवसांपुर्वी ब्रॉडबॅंड इंटरनेटची नवी योजना सादर केली होती. याअंतर्गत कंपनी ग्राहकांना तब्बल 1000 जीबी बोनस डेटा देण्याची तयारी करीत आहे. परंतू हा मोफत डेटा फक्त ठराविक योजनांमध्येच उपलब्ध होणार असून, या सेवांची खरेदी फक्त ऑनलाईन पद्धतीने करता येईल.

मुंबई: देशभरातील कानाकोपऱ्यात इंटरनेट पोचवणाऱ्या रिलायन्स जिओची ब्रॉडबँड सेवा दिवाळीच्या सुमारास सुरु होण्याची शक्यता आहे. कंपनी 'जिओ फायबर' सेवेमार्फत ग्राहकांना अवघ्या 500 रुपयांमध्ये 100 जीबी डेटा देणार आहे, असे वृत्त एका इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झाले आहे. याआधीदेखील रिलायन्स जिओने 170 दिवसांमध्ये शंभर कोटी ग्राहक मिळविण्याचा विक्रम केला होता.

सध्या बाजारात असलेल्या सर्व ब्रॉडबॅंड सेवा ग्राहकांना सुमारे हजार रुपयांमध्ये 100 जीबीपेक्षाही कमी डेटा देतात. परंतु आपल्या स्वस्त सेवांमुळे रिलायन्स जिओप्रमाणेच जिओ फायबरदेखील लोकांपर्यंत पोचेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या काही शहरांमध्ये जिओ फायबरची चाचणी सुरु आहे. एकदा अधिकृत लाँच झाल्यावर मात्र जिओ फायबर आणखी शहरात उपलब्ध होईल.

जसे रिलायन्स जिओच्या आगमनानंतर दूरसंचार क्षेत्रात किंमत युद्ध सुरु झाले होते त्याप्रमाणे आता जिओ फायबरमुळे ब्रॉडबँड इंटरनेट क्षेत्रात धुमाकूळ निर्माण होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. याशिवाय, रिलायन्स जिओदेखील येत्या जून महिन्यापासून त्यांची मोफत इंटरनेट सेवा आणखी शहरांमध्ये विस्तारण्याची तयारी करीत आहे.

याअंतर्गत एअरटेल ग्राहकांना 899 रुपयांमध्ये वर्षभर अमर्यादित फोन कॉल्स, 16 एमबीपीस स्पीडने 60 जीबी डेटा व 750 जीबी बोनस डेटा देणार आहे. त्याचप्रमाणे, आणखी एका योजनेत 1099 रुपयांमध्ये अमर्यादित फोन कॉल्स, 40 एमबीपीस स्पीडने 90 जीबी डेटा व 1000 जीबी बोनस डेटा दिला जाणार आहे. याशिवाय 1299 रुपये, 1499 रुपये आणि 1799 रुपयांमध्ये ग्राहकांना अमर्यदित फोन कॉल्ससह अनुक्रमे 125, 160 आणि 220 जीबी डेटा उपलब्ध करुन दिला जाणार आहे. या सर्व योजनांमध्ये एक हजार जीबी डेटा बोनस मिळणार आहे.

Web Title: mumbai news reliance jio diwali offer telecom business