esakal | शेअर बाजाराला ‘विषाणूज्वर’;युरोपीय शेअर बाजारही तीन टक्‍क्‍यांनी कोलमडले
sakal

बोलून बातमी शोधा

sharemarket

गुंतवणुकदारांच्या समभागांचे मूल्य साडेसहा लाख कोटी रुपयांनी रोडावले आहे. मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्‍स काल तीन टक्के म्हणजे १,४०६ अंशांनी घसरला. युरोपीय शेअर बाजारही तीन टक्‍क्‍यांनी कोलमडले. 

शेअर बाजाराला ‘विषाणूज्वर’;युरोपीय शेअर बाजारही तीन टक्‍क्‍यांनी कोलमडले

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई - इंग्लंडमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारामुळे काल भारतीय शेअरबाजारांमधील तेजीच्या फुग्याला टाचणी लागली. गुंतवणुकदारांच्या समभागांचे मूल्य साडेसहा लाख कोटी रुपयांनी रोडावले आहे. मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्‍स काल तीन टक्के म्हणजे १,४०६ अंशांनी घसरला. युरोपीय शेअर बाजारही तीन टक्‍क्‍यांनी कोलमडले. 

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील काल ४३२ अंशांनी घसरून दिवसअखेर १३,३२८ अंशांवर स्थिरावला. २५ नोव्हेंबर रोजी निफ्टी २७२ अंशांनी घसरला होता. तो अपवाद वगळला तर तीन नोव्हेंबरपासून निफ्टीने ११,७३४ अंशांपासून ते १८ डिसेंबरपर्यंत १३,७६० अंशांपर्यंत सतत चढती कमान दाखवली होती. कोरोनावरील अनेक लशी बाजारात येत असल्याने जगातील सर्वच शेअर बाजारांमध्ये तेजी आली होती. आज या तेजीला ब्रेक लागला. 

इनकम टॅक्स रिटर्न भरताय; मग नक्कीच बातमी वाचा

काल सकाळी व्यवहार सुरु झाल्यानंतर सेन्सेक्‍सने ४७,०५५.६९ असा सर्वकालिक उच्चांक नोंदवला. मात्र दुपारी बारा वाजल्यानंतर निर्देशांकांमध्ये पडझड सुरु झाली. निफ्टीनेही काल व्यवहारादरम्यान १३,७७७.५० असा सर्वकालिक उच्चांक नोंदविला होता. यावर्षी मार्च महिन्यात निफ्टीने सव्वाआठ टक्‍क्‍यांपर्यंत तसेच ६२० अंशांपर्यंत पडझड अनुभवली होती. त्यानंतर निफ्टीमध्ये  काल प्रथमच एवढी मोठी घसरण झाली. 

यांना फटका 
सेन्सेक्‍सच्या प्रमुख ३० समभागांमधील नेस्ले इंडिया (बंद भाव १८,१७२ रु.) काल सर्वांत कमी म्हणजे सुमारे एक टक्का घसरला, तर ओएनजीसी सर्वांत जास्त म्हणजे साधारण सव्वा नऊ टक्के ( बंद भाव ८९.९० रु.) घसरला. इंडसइंड बॅंक (८४१), महिंद्र आणि महिंद्र (६८६), स्टेट बॅंक (२५४) व एनटीपीसी (९७.५०) हे समभाग सहा टक्‍क्‍यांपर्यंत घसरले. आयटीसी (२०२), ऍक्‍सीस बॅंक (५८२), एअरटेल (४९०), रिलायन्स (१,९३९) यांचे दरही घसरले. बजाज फिनसर्व्ह ३६५ रुपयांनी तर बजाज फायनान्स २०९ रुपयांनी घसरला. 

हेही वाचा : प्रत्येक आठवड्याला गॅसचे दर कमी-जास्त होण्याची शक्यता

अनिश्‍चिततेचा दणका 
इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूच्या अनिश्‍चिततेमुळे काल युरोप व भारतीय शेअर बाजारांमध्ये तुफानी विक्री झाली. विक्रीचा हा मारा एवढा सर्वदूर होता की निफ्टीच्या ५० प्रमुख समभागांपैकी तसेच, सेन्सेक्‍सच्या ३० प्रमुख समभागांपैकी सर्वच्या सर्व समभागांचे दर दिवसअखेर घसरले. सेन्सेक्‍समधील २,४७२ समभागांचे दर घसरले तर फक्त ५६४ समभागांचे दर वाढले. १५६ समभागांचे दर तेच राहिले. निफ्टीच्या १,७२४ समभागांचे दर घसरले, २५७ समभागांचे दर वाढले तर ४९ समभागांचे दर तेच राहिले.