

पुढील वर्ष वाहन उद्योगासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. कारण इंटर्नल कम्बॅशनच्या गाड्यांबरोबर इलेक्ट्रिक वाहनांचे सादरीकरण ऑटो एक्स्पो व त्यानंतर टप्प्याटप्प्याने होणार आहे. त्यामुळे ही भारतीय वाहन उद्योगासाठी बदलाची नांदी ठरणार आहे.
जगातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या वाहन बाजारपेठेपैकी एक असणाऱ्या भारतीय वाहन बाजारपेठेने सर्वच वाहन कंपन्यांपुढे आव्हान उभे केले आहे. यामागे अनेक कारणे आहेत, पण जगातील विकसित अर्थव्यवस्थांमध्ये वाहनांच्या विक्रीवाढीस वा त्यात सातत्य ठेवणे हे आव्हानाच्याही पलीकडे गेले आहे. भारतात वाहन विक्री मग ती दुचाकी असो चारचाकी वा मोठी व्यावसायिक वाहने, सर्वच प्रकारांत विक्रीत घट दिसत असली, तरी ती गेल्या वर्षाच्या तुलनेतील घट आहे; मात्र वाहन विक्री नकारात्मक वा अत्यल्प झाली आहे असे मात्र नक्कीच नाही. त्यामुळेच जागतिक पातळीवर वाहनविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांची भिस्त ही भारत या वाहनांच्या उदयोन्मुख बाजारपेठेकडे आहेच. त्यामुळेच या वर्षी चारचाकींचे उत्पादन करणाऱ्या दोन परकी वाहन कंपन्यांनी भारतात प्रवेश केला असून फीचर, क्वॉलिटी, डिझाईन्स व किमतीमुळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत योग्य किमतीत अधिक फीचर देणाऱ्यांना मागणी आहे असे दिसते आहे. या कंपन्यांना मिळालेल्या प्रतिसादामुळेच अन्य कंपन्यांनीही त्यांच्या वाहनांचा पोर्टफोलिओ सुधारण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे, पण हे करताना भविष्यात अनेक गोष्टी जागतिक बाजारपेठेप्रमाणे भारतात बदलणार असून त्याचा विचारही कंपन्या करीत आहेत. त्यामुळेच भारतात आगामी काळात सादर होणारी वाहने ही भविष्यातील मोबिलिटीची नांदी ठरणार आहे. लवकरच त्याची झलक भारतीयांना पाहायला मिळणार आहे. दर दोन वर्षांनी भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑटो एक्स्पो होते. पुढील वर्षी फेब्रुवारीत ते होणार असून, या वर्षीचे ऑटो एक्स्पो हे जरा वेगळे असणार आहे.
आतापर्यंत झालेल्या ऑटो एक्स्पोत पारंपरिक म्हणजे इंटर्नल कम्बॅशन सिस्टीमवर आधारित गाड्या लॉंचिंगचेच प्रमाण अधिक राहिले आहे, पण वाहनातून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनामुळे जागतिक पातळीवर प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाय योजले जात आहेत. त्यातूनच नवीन पर्याय म्हणून जागतिक पातळीवर विशेषतः विकसित अर्थव्यवस्थांमध्ये इलेक्ट्रिकवरील वाहनांच्या वापरवार व विकासावर भर दिला जात आहे. भारत सरकारनेही प्रदूषणावर उपाय योजण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांवर भर देण्याचे धोरण आखले आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असणारी चार्जिंग स्टेशन्स सार्वजनिक व खासगी स्वरूपात उभाण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे परदेशी कंपन्यांबरोबर भारतीय कंपन्यांकडूनही इलेक्ट्रिक वाहने सादर होणार आहेत. भारतीय इलेक्ट्रिक वाहने ही खास असणार आहेत. कारण जागतिक पातळीवर विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा भारतीय कंपन्यांची इलेक्ट्रिक वाहने रास्त किमतीस मिळण्याची शक्यता अधिक आहे.
इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण झाल्यावर व मास मॅन्युफॅक्चरिंग सुरू झाल्यावर अशा वाहनांच्या किमतीही खाली येण्यास सुरुवात होईल, पण पहिल्या काही वर्षांत ती शक्यता कमी आहे. कारण या वाहनांचे तंत्रज्ञान. भारतात सध्या महिंद्र ई व्हेरिटो, टाटा मोटर्स टिगॉर, ह्युंदाई कोना आदी इलेक्ट्रिक वाहने बाजारपेठेत उपलब्ध आहेत, पण या वाहनांना अपेक्षित असा प्रतिसाद नाही, कारण लोकांमध्येही इलेक्ट्रिक वाहनांबाबत संभ्रम आहे. पण असे असले तरी भारतीय वाहन बाजारपेठेचे भविष्य हे इलेक्ट्रिक वाहनांच्या दिशेनेच राहणार आहे. त्यामुळेच टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, ह्युंदाई, निस्सान, एमजी मोटर, महिंद्र अँड महिंद्र, रेनॉ, मर्सिडीज बेंझ, ऑडी, हीरो, होंडा, टीव्हीएस आदी कंपन्यांची इलेक्ट्रिक वाहने बाजारात येणार आहेत.
मारुती सुझुकी
या वर्षाच्या सुरुवातीपासूनच मारुती सुझुकीने वॅगन आर या कारच्या इलेक्ट्रिक व्हर्जनची रस्त्यावरील चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे, पण वॅगन आरचे कोणते मॉडेल म्हणजे जागतिक पातळीवरील किंवा सध्या भारतात उपलब्ध असणारे मॉडेल भारतात लॉंच केले जाईल हे स्पष्ट नाही; मात्र वॅगनआर कारच्या माध्यमातून मारुती सुझुकीची एंट्री इलेक्ट्रिक गाड्यांच्या सेग्मेंटमध्ये होण्याची शक्यता आहे.
टाटा मोटर्स
टाटा मोटर्स नेक्सॉन व अल्ट्रूझ या गाड्यांचे इलेक्ट्रिक व्हर्जन पुढील वर्षी लॉंच होण्याची शक्यता आहे. झिपट्रॉन ईव्ही हे इलेक्ट्रिक वाहनांचे नवे तंत्रज्ञान या गाडीसाठी वापरण्याची शक्यता असून, एकदा चार्ज केल्यावर तीनशे किलोमीटर अंतर जाण्याची क्षमता या गाडीत असण्याची शक्यता आहे; मात्र याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. तसेच टाटा मोटर्स अल्ट्रूझ या कारच्या माध्यमातून प्रीमियम हॅचबॅक सेग्मेंटमध्ये प्रवेश करीत आहेत. नेक्सॉननंतर झिप्ट्रॉन तंत्रज्ञानावर आधारित दुसरी गाडी अल्ट्रूझ असू शकेल. एकदा चार्ज केल्यावर ही गाडी अडीचशे ते तीनशे कि.मी. जाण्याची शक्यता आहे.
महिंद्र
महिंद्रच्या ई वाहनांचा ताफा मोठा असला तरीही महिंद्र नव्या इलेक्ट्रिक वाहनांवर विशेष लक्ष देत आहे. ईकेयूव्ही 100 ही गाडी इलेक्ट्रिक स्वरूपात लॉंच होण्याची शक्यता आहे, तसेच सध्याच्या ई व्हेरिटो गाडीपेक्षा अधिक शक्तिशाली असेल. सध्याच्या उपलब्ध चार्जिंग तंत्रज्ञानापेक्षा अधिक ऊर्जाक्षम बॅटरी यात वापरली जाऊ शकते. एक्सयूव्ही 300 गाडीदेखील इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये लॉंच होण्याची अपेक्षा आहे. केयूव्ही 100 पेक्षा ही गाडी नक्कीच प्रीमियम असेल.
रेनॉ
रेनॉकडे इलेक्ट्रिकचे प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध आहे. या वर्षी चीनमध्ये कंपनीने क्विड या स्मॉल कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन सादर केले. भारतात इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा नसल्याने कंपनीने ही गाडी येथे उपलब्ध करून दिलेली नाही. भारतात रेनॉ क्विड ईव्ही कधी उपलब्ध होईल याबाबत स्पष्टता नाही. ही गाडी पूर्ण चार्ज झाल्यावर 270 कि.मी. अंतर जाऊ शकते.
एमजी मोटर
हेक्टर या मिळालेल्या यशामुळे एमजी मोटर भारतीय बाजारपेठेबाबत आश्वासक वाटत आहे. कंपनीने आगामी काळात भारतीय बाजारपेठेत संपूर्णतः इलेक्ट्रिक एसयूव्ही उपलब्ध करण्याची तयारी सुरू केली असून, विपणनही सुरू झाले आहे. एकदा चार्ज केल्यावर चारशे कि.मी. अंतर जाण्याची अपेक्षा आहे.
बजाज ऑटो
एकेकाळी स्कूटर बनवणारी कंपनी अशी ओळख असलेल्या बजाज ऑटोने पुन्हा स्कूटर बाजारपेठेत प्रवेश करण्याची तयारी पूर्ण केली आहे. चेतक या पूर्वीच्या यशस्वी आयसीव्ही स्कूटरचे इलेक्ट्रिक मॉडेल कंपनी बाजारात आणणार आहे. चेतकचे मॉडेल कंपनीने काही दिवसांपूर्वी सादर केले होते, पण प्रत्यक्षात ते पुढील वर्षी बाजारात येण्याची अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.