नव्या आर्थिक वर्षाची सुरवात कशी कराल? 

investment
investment

आजपासून सुरू होणाऱ्या 2019-20 या नव्याकोऱ्या आर्थिक वर्षासाठी कोणते संकल्प करणे योग्य राहील, ते थोडक्‍यात पाहूया. अर्थात फक्त संकल्प करून उपयोगाचे नाही, तर त्याची प्रत्यक्ष अमलबजावणी होणे अत्यावश्‍यक आहे. 

गेल्या आर्थिक वर्षाच्या प्रारंभी "तुमची आर्थिक साक्षरता तुम्हीच तपासा!' या मथळ्याखाली पालकांची "आर्थिक साक्षरता' परीक्षा घेण्यात आली होती. त्यामध्ये किती पालक पास किंवा नापास झाले, ते कळायला मार्ग नाही. परंतु पुण्या-मुंबईसारख्या बड्या शहरांमध्ये असलेले आर्थिक निरक्षरतेचे मोठे प्रमाण पाहता, नेहमीच्या व्यापातून आर्थिक शिस्तीकडे किंवा स्वावलंबनाकडे पुरेशा गांभीर्याने पाहिले जात नाही, हेच सिद्ध होते. 

आजपासून सुरू होणाऱ्या 2019-20 या नव्याकोऱ्या आर्थिक वर्षासाठी कोणते संकल्प करणे योग्य राहील, ते थोडक्‍यात पाहूया. अर्थात फक्त संकल्प करून उपयोगाचे नाही, तर त्याची प्रत्यक्ष अमलबजावणी होणे अत्यावश्‍यक आहे. 

1) आर्थिक नियोजन अर्थात फायनान्शिअल प्लॅनिंग ः चलनवाढीचा दर लक्षात घेऊन आपल्या विविध उद्दिष्टांसाठी केव्हा आणि किती पैसे लागणार आहेत, ते तपासून पुढील खर्चाचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे ठरते. उदाहरणार्थ, रुपयाच्या आजच्या मूल्याप्रमाणे, मुलांच्या लग्न किंवा शिक्षणासाठी तुम्हाला 10 लाख रुपये खर्च करण्याची इच्छा आहे आणि हे उद्दिष्ट जर 24 वर्षांनी असेल तर तुम्हाला 10 लाख नव्हे, तर 64 लाख रुपयांची व्यवस्था करावी लागणार आहे. हे लक्षात ठेऊन गुंतवणूक करायला हवी, कारण या विभागासाठी चलनवाढ साधारणपणे 8 टक्के असण्याची शक्‍यता आहे. 
2) योग्य "एसआयपी' ः साधी "एसआयपी' करण्यापेक्षा "एसआयपी प्लस' (मोफत विम्यासह) आणि "व्हॅल्युएशन ट्रिगर एसआयपी' करावी; ज्यामध्ये "पीइ रेशो'नुसार बाजार खाली असताना आपोआप जास्त पैसे गुंतविले जातात. त्याचप्रमाणे, "एसआयपी' सुरू करतानाच त्यामध्ये दरवर्षी आपोआप कमीतकमी 5 टक्के "टॉप-अप' करावे. त्यामुळे आपली उद्दिष्टे लवकर पूर्ण होतील. शेअर्समध्येसुद्धा स्वनियंत्रित "एसआयपी' करायला हवी, जेणेकरून दरमहा विशिष्ट रकमेचे थोडे-थोडे शेअर घेत गेल्यास दीर्घकाळात शेअरची संख्या "थेंबे थेंबे तळे साचे' पद्धतीने मोठी होऊ शकते. काही ठराविक वाहिन्यांवर सांगितलेले शेअर किंवा मोबाईलवर आलेल्या "टिप्स' यांवर अवलंबून न राहता तज्ज्ञ आणि अनुभवी सल्लागारांच्या मदतीने शेअरमध्ये गुंतवणूक करावी. 
3) प्राप्तिकर बचत : प्राप्तिकर बचतीसाठी मार्च महिन्यात घाईघाईने गुंतवणूक करण्यापेक्षा आजपासूनच "टॅक्‍स प्लॅनिंग' करावे आणि म्युच्युअल फंडांच्या योग्य "इएलएसएस' योजनेमध्ये गुंतवणुकीचा जरूर विचार करावा. परताव्याची खात्री दिली जात नसली तरीही "कमीतकमी लॉक-इन-पीरियड' आणि "जास्त परताव्याची शक्‍यता' हे या योजनांचे वैशिष्ट्य असते. 
4) पीपीएफ ः स्वेच्छेने उघडल्या जाणारे "पीपीएफ'चे खाते अजूनही उघडले नसल्यास ते अवश्‍य उघडावे. त्यात आर्थिक वर्षाच्या म्हणजे एप्रिलच्या पाच तारखेच्या आत पैसे भरल्यास पूर्ण 12 महिन्यांचे व्याज (करमुक्त) मिळू शकते. हे खाते दीर्घकाळ चालू ठेवल्यास निवृत्तीचे नियोजनही आपोआप होऊ शकते. 
5) पीएफ ः आधी सोडलेल्या कंपनीमधील "पीएफ'ची रक्कम ही सध्याच्या कंपनीमधील "पीएफ'च्या खात्यात हस्तांतरित झाली आहे का, ते तपासा. 
6) कर्जे ः आधी घेतलेल्या जास्त व्याजाची कर्जे ही कमी व्याजदर असणाऱ्या बॅंकांमध्ये हस्तांतरित करावीत किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी कर्जाच्या परतफेडीला प्राधान्य द्यावे. 
7) विमा ः विमा आणि गुंतवणूक या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याची गल्लत करू नका; तसेच त्यांची तुलनाही करू नका. आयुर्विमा फक्त "टर्म इन्शुरन्स'च असायला हवा. त्यासोबत आपल्यासह आपल्या कुटुंबीयांसाठी पुरेसा मेडिकल अर्थात आरोग्य विमा नक्की घ्यायला हवा. 
8) इच्छापत्र ः एकापेक्षा अधिक मुले असणाऱ्यांनी वकिलांच्या सल्ल्याने योग्य वयातच इच्छापत्र जरूर करावे. 
9) आढावा ः दर सहा महिन्यांनी केलेल्या आर्थिक नियोजनाचा आणि गुंतवणुकीचा अवश्‍य आढावा घ्यायला हवा. 
10) नोंदी किंवा रेकॉर्ड ः सर्व प्रकारच्या गुंतवणुकीची आणि विम्याची संगणकामध्ये किंवा वहीमध्ये नोंद करावी. घरातील जोडीदाराला किंवा अन्य जबाबदार सदस्यांना वेळोवेळी पासवर्डसह त्याची माहिती समजावून सांगावी. 
वरील सर्व गोष्टींसाठी तज्ज्ञ व अनुभवी सल्लागाराची मदत घ्यावी. चला तर मग, आजपासूनच या सर्व गोष्टींचा श्रीगणेशा करूया!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com