आधुनिक यंत्रणेद्वारे गृहनिर्माण सोसायट्यांना सुरक्षा! 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

पुणे : एखादी घरफोडी किंवा खून झाल्यानंतर गृहनिर्माण सोसायट्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न गंभीरपणे चर्चिला जातो. पण यासाठीच्या खर्चाचा विषय निघाल्यास सुरक्षेचा प्रश्‍न मागे पडताना दिसतो. नेमकी हीच समस्या लक्षात घेऊन झायकॉम या आधुनिक इलेक्‍ट्रॉनिक सुरक्षा पुरविणाऱ्या कंपनीने व्यक्तिगत सुरक्षेबरोबरच अशा गृहनिर्माण सोसायट्या, बॅंका आणि व्यावसायिक संस्थांना दिलासा देणारा उपक्रम सुरू केला आहे. 

पुणे : एखादी घरफोडी किंवा खून झाल्यानंतर गृहनिर्माण सोसायट्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न गंभीरपणे चर्चिला जातो. पण यासाठीच्या खर्चाचा विषय निघाल्यास सुरक्षेचा प्रश्‍न मागे पडताना दिसतो. नेमकी हीच समस्या लक्षात घेऊन झायकॉम या आधुनिक इलेक्‍ट्रॉनिक सुरक्षा पुरविणाऱ्या कंपनीने व्यक्तिगत सुरक्षेबरोबरच अशा गृहनिर्माण सोसायट्या, बॅंका आणि व्यावसायिक संस्थांना दिलासा देणारा उपक्रम सुरू केला आहे. 

कंपनीने "सॉफ्टवेअर ऍज अ सर्व्हिस'च्या (सास) माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी सुरक्षाविषयक यंत्रणा पुरविण्यास सुरवात केली आहे. यामुळे संबंधित घटकांना सुरक्षेसाठीची यंत्रसामग्री, हार्डवेअर आदींवर खर्च न करता फक्त सेवेसाठीचे माफक शुल्क भरून आपली गरज भागवता येणार आहे. 

"झायकॉम'ने प्रारंभी मुंबई आणि पुण्यातील गृहनिर्माण सोसायट्यांवर लक्ष केंद्रित केले असून, आतापर्यंत 4500 सोसायट्यांमध्ये त्यांची देखरेख यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. कंपनीकडून अशा सोसायट्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, रेकॉर्डर आदी सर्व गोष्टी बसविल्या जातात आणि त्यांच्या रिमोट सेंटरमधून त्यावर देखरेख ठेवली जाते. सोसायटीच्या आवारात काही गैरप्रकार घडत असेल, तर त्याची दखल लगेच घेतली जाते. त्यामुळे चोरीसारख्या घटनांना आळा बसायला लागला आहे. गेल्या सहा महिन्यांत या ठिकाणी कोणत्याही गुन्ह्याची नोंद झाली नाही, अशी माहिती झायकॉम इलेक्‍ट्रॉनिक सिक्‍युरिटी सिस्टिम्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद राव यांनी येथे दिली. "मेक युअर सिटी सेफ' या उपक्रमामुळे निवासी गृहसंकुलांना कोणतीही गुंतवणूक न करता, आकर्षक मासिक व वार्षिक शुल्कात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सुरक्षा कवच मिळत आहे; शिवाय रखवालदाराच्या पगारावरील खर्च वाचत आहे, असे त्यांनी नमूद केले. 

कंपनीकडून अशाच प्रकारची यंत्रणा रिटेल स्टोअरसारख्या व्यावसायिक संस्थांमध्ये बसविली जाते. तेथील कर्मचाऱ्यांची उपस्थिती, येणाऱ्या ग्राहकांवर देखरेख, ग्राहकांची दिवसभरातील संख्या आदींची माहिती उपलब्ध करून दिली जाते. तसेच बॅंकांच्या एटीएम केंद्रांवर सेन्सरआधारित देखरेख यंत्रणाही बसविली जाते. या यंत्रणेमुळे अशा केंद्रांवरील संशयास्पद हालचाली, आवाज आदी गोष्टी टिपल्या जातात, जेणेकरून संभाव्य गुन्हा घडण्यास अटकाव केला जाऊ शकतो, असेही श्री. राव यांनी सांगितले. 
 
'झायमॅन'द्वारे व्यक्तिगत सुरक्षाही उपलब्ध 
रात्रीच्या वेळी किंवा निर्मनुष्य भागातून जात असताना लुटण्यासारखे प्रकार सर्रास घडताना दिसतात. शिवाय महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍नही कायमच चर्चेत असतो. यावर उपाय म्हणून कंपनीने "झायमॅन' ही स्मार्टफोनआधारित व्यक्तिगत सुरक्षा प्रणाली विकसित केली आहे. त्यात सुरक्षा अलार्मबरोबरच संकटात सापडलेल्या व्यक्तीचा ठावठिकाणा आणि प्रसंगी थेट व्यक्तिगत मदत पुरविण्याच्या यंत्रणेचा समावेश आहे, असे श्री. राव यांनी नमूद केले.
  
 
 

Web Title: New technique for security at housing societies