जुन्या मोटारी, दागिन्यांच्या विक्रीवर जीएसटी नाही

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 जुलै 2017

जुन्या दागिन्यांऐवजी नव्या दागिन्यांची खरेदी करताना घडणावळीवर वस्तू व सेवा कर भरावा लागेल. ग्राहकांना घडणावळीवर 18 टक्के जीएसटी भरावा लागेल

नवी दिल्ली: सरकारने सामान्य नागरिकांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. एखाद्या नागरिकाच्या जुन्या मोटारीची किंवा जुन्या दागिन्यांच्या विक्री व्यवहारावर वस्तू व सेवा कराची(जीएसटी) आकारणी होणार नाही असे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे. हा व्यवहार कोणत्याही व्यवसायात मोडत नसल्यामुळे यावर कोणताही कर आकारण्यात येणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

केंद्रीय जीएसटी कायद्यातील कलम 9(4) मधील तरतुदीनुसार विक्रेत्याने ग्राहकाकडून जुन्या सोन्याची खरेदी केल्यास "रिव्हर्स चार्ज मेकॅनिझ्म"अंतर्गत त्यावर 3 टक्के दराने जीएसटी लागू होईल, असे वक्तव्य हसमुख अधिया यांनी केले होते. त्याचप्रमाणे, ज्या ज्वेलरने जीएसटी नेटवर्कमध्ये आपल्या व्यवसायाची नोंदणी केली नसेल त्याला या व्यवहारांवर 3 टक्के वस्तू व सेवा कर भरावा लागेल. नोंदणीकृत सदस्याकडून कोणताही कर आकारला जाणार नाही. परंतु, नागरिकाने वैयक्तिक पातळीवर केलेली दागिन्यांची विक्री ही व्यावसायिक दृष्टीकोनातून नसते. त्यामुळेच दुकानदारालादेखील त्यावर कर भरायची गरज भासणार नाही, असेही या कायद्यात नमूद करण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे. जुन्या मोटारी किंवा दुचाकी वाहनांसाठीदेखील हाच नियम लागू असल्याचे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे.

जुन्या दागिन्यांऐवजी नव्या दागिन्यांची खरेदी करताना घडणावळीवर वस्तू व सेवा कर भरावा लागेल. ग्राहकांना घडणावळीवर 18 टक्के जीएसटी भरावा लागेल. जुने दागिने देऊन नवे दागिने घेतले तर याला सेवा मानले जाते, असे सरकारने सांगितले आहे.

Web Title: No GST on sale of old gold jewellery, cars by individuals