नोटाबंदी भारतासाठी सकारात्मक

वृत्तसंस्था
बुधवार, 1 मार्च 2017

गुंतवणूक सेवा संस्थेचा अंदाज; भविष्यात चांगले परिणाम

नवी दिल्ली: नोटाबंदीमुळे भारतातील करचुकवेगिरी आणि भ्रष्टाचार कमी होईल, असा अंदाज व्यक्त करीत "मूडीज' या गुंतवणूक सेवा संस्थेने अर्थव्यवस्थेसाठी नोटाबंदी सकारात्मक ठरेल, असे भाकीत वर्तविले आहे.

गुंतवणूक सेवा संस्थेचा अंदाज; भविष्यात चांगले परिणाम

नवी दिल्ली: नोटाबंदीमुळे भारतातील करचुकवेगिरी आणि भ्रष्टाचार कमी होईल, असा अंदाज व्यक्त करीत "मूडीज' या गुंतवणूक सेवा संस्थेने अर्थव्यवस्थेसाठी नोटाबंदी सकारात्मक ठरेल, असे भाकीत वर्तविले आहे.

चालू आर्थिक वर्षातील जानेवारी ते मार्च या कालावधीत विकासदर 6.4 टक्के राहणार असल्याचे "मूडीज'ने म्हटले आहे. त्याआधीच्या तिमाहीत विकासदर 7 टक्के होता. "मूडीज'ने म्हटले आहे, की नव्या नोटा चलनात येण्याचा वेग कायम राहील, असे आम्हाला अपेक्षित आहे. नोटाबंदीमुळे करचुकवेगिरी आणि भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होईल. आर्थिक आणि वित्तीय घडामोडींत सुसूत्रीकरण करण्यात आल्याने कार्यक्षमता वाढणार आहे, यामुळे करकक्षेत येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढेल आणि वित्तीय व्यवस्थेचा वापर विस्तारेल. यामुळे अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक स्थिती निर्माण होत आहे.

नोटाबंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा बॅंकिंग यंत्रणेत आल्या आहेत. या मोहिमेत आधीचे अवैध अथवा अघोषित उत्पन्न वैध म्हणून जाहीर करता येत आहे. यामुळे सरकारला करकक्षेच्या बाहेरील आणि करचुकवेगिरी करणाऱ्या नागरिकांची माहिती मिळणार आहे. यामुळे भविष्यात करसंकलन वाढून सरकारला करचुकवेगिरी रोखण्यासाठी योग्य उपाययोजना करता येतील. मात्र, अद्यापपर्यंत अशा उपाययोजना जाहीर झालेल्या नाहीत. देशातील आर्थिक उलथापालथ आणि रोकड टंचाई कमी झाल्यानंतर मागणी वाढून गुंतवणूकही वाढेल, असेही "मूडीज'ने नमूद केले आहे.

बॅंकांसाठी तिमाही खडतर
नोटाबंदीमुळे बॅंकांच्या मत्तेवर आणि कर्जाच्या मागणीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. पुढील काही महिने ही परिस्थिती कायम राहणार आहे. भारतीय बॅंकांकडे पुरेशा प्रमाणात रोकड साठा असल्यामुळे त्या या परिस्थितीत तग धरून राहतील. बॅंकांच्या ठेवींमध्ये केवळ 1 ते 2 टक्के वाढ झाली असून, बॅंकिंग यंत्रणेत आलेली रोकड प्रामुख्याने किरकोळ व्यवहारांमध्ये फिरत राहील, असा अंदाज "मूडीज'ने वर्तविला आहे.

Web Title: Note ban positive for India