आता पाचशेच्या नोटा होणार सर्व व्यवहारातून बाद

वृत्तसंस्था
बुधवार, 14 डिसेंबर 2016

जुन्या पाचशेच्या नोटा वापरण्यासाठी देण्यात आलेली सूट 15 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे.

नवी दिल्ली - औषध खरेदी किंवा जिवनाश्यक सेवांची बिले भरण्यासाठी चलनातून बाद झालेल्या पाचशेच्या जुन्या नोटा स्वीकारण्याची अंतिम मुदत 15 डिसेंबर असून यात कोणताही बदल केला जाणार नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, या नोटा बँकेत जमा करण्याची मुदत कायम असणार आहे. 
 
"जुन्या पाचशेच्या नोटा वापरण्यासाठी देण्यात आलेली सूट 15 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे", असे वित्त सचिव शक्तिकांत दास यांनी ट्विटरवर म्हटले आहे. 

केंद्र सरकारने गेल्या महिन्यात 8 तारखेला आर्थिक व्यवहारातून पाचशे व हजारांच्या नोटा बाद झाल्याचे जाहीर केले होते. परंतु अचानक निर्माण झालेली आर्थिक आणीबाणी लक्षात घेऊन काही ठिकाणी या नोटा वापरण्याची सूट देण्यात आली होती. परंतु आता ही सूट रद्द करण्यात आली आहे. याआधीच सरकारने रेल्वे आणि विमान तिकीटे खरेदी, पेट्रोल पंप आणि टोल नाक्यांवरील पाचशेच्या नोटांचा वापर बंद केला आहे.

Web Title: Old Rs 500 notes not acceptable from December 15 mid-night