‘शॉप अॅक्‍ट’साठी ऑनलाइन ‘डोकेदुखी’

वृत्तसंस्था
सोमवार, 19 जून 2017

नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी यंत्रणाच नाही

पुणे: "शॉप ऍक्‍ट आणि लेबर लायसन्स' काढण्यासाठी "महा-ऑनलाइन' या संकेतस्थळावर ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र नागरिकांना यामध्ये काही तांत्रिक अडचणी असतील, तर त्याची सोडवणूक करण्यासाठी कामगार आयुक्तालयामध्ये एकही सक्षम अधिकारी उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांना "ऑनलाइन' सुविधेमुळे "डोकेदुखी'चा त्रास सहन करावा लागत आहे.

नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी यंत्रणाच नाही

पुणे: "शॉप ऍक्‍ट आणि लेबर लायसन्स' काढण्यासाठी "महा-ऑनलाइन' या संकेतस्थळावर ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र नागरिकांना यामध्ये काही तांत्रिक अडचणी असतील, तर त्याची सोडवणूक करण्यासाठी कामगार आयुक्तालयामध्ये एकही सक्षम अधिकारी उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांना "ऑनलाइन' सुविधेमुळे "डोकेदुखी'चा त्रास सहन करावा लागत आहे.

कामगार आयुक्तालयातील विविध कामे पारदर्शकपणे आणि गतिमान होण्यासाठी सर्व प्रकारचे परवाने ऑनलाइन देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेतला. त्यासाठी "महा-ऑनलाइन'द्वारे परवाने काढण्याची सुविधा दिली. त्यामध्ये आवश्‍यक कागदपत्रांची स्कॅनिंग, डिजिटल स्वाक्षरी आणि अन्य माहिती भरून देता येते. मात्र अनेकदा कामे सहजपणे होण्यापेक्षा तांत्रिक अडचणींमुळे ती किचकट होत आहेत. तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी आवश्‍यक ती स्वतंत्र यंत्रणा कामगार आयुक्तालयामध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे याबाबतच्या असंख्य तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत.

विशेष म्हणजे आयुक्तालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनादेखील अशा प्रकारच्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. मुंबई येथील अधिकारी एक तर "फोन किंवा ई-मेल'ला प्रतिसाद देत नाहीत, दिलाच तर "कामाचा खूप ताण आहे' अशी सबब देऊन कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कामगार आयुक्तालयाचा कारभार "रामभरोसे' चालू आहे, अशी तक्रार नागरिक करीत आहेत.

मी गेले अनेक महिने "शॉप ऍक्‍ट' परवाना मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी ऑनलाइन पद्धतीने फॉर्मदेखील भरला. मात्र "स्कॅन' केलेल्या कागदपत्रांची "साइज' योग्य नसल्याने तो अर्ज मान्य झाला नाही. दुरुस्तीचा पर्याय निवडून पुन्हा अर्ज भरूनसुद्धा मान्य होत नाही. यासंबंधी हेल्पलाइनवर संपर्क साधला असता, कोणीच प्रतिसाद दिला नाही. कामगार आयुक्तालयातील अधिकारी म्हणतात, "आमच्याकडे त्याचे काही अधिकार नाहीत, त्यासाठी मुंबई येथील मुख्य कार्यालयाशी संपर्क करा.' यामुळे अनेक दिवसांपासून माझे काम रखडले आहे.
- अमित बेंद्रे, नागरिक

कामगार सहआयुक्त 'नॉट रिचेबल' ! 
महा-ऑनलाइनवर अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कामगार आयुक्तालयामध्ये स्वतंत्र यंत्रणा नाही. या संदर्भात कामगार सहआयुक्त ब. रा. देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता ते "नॉट रिचेबल' असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या. "सकाळ'नेही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

Web Title: Online 'headache' for 'Shop Act'