तेल उत्पादन कमी करण्याचा 'ओपेक’चा निर्णय

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

तेलाचे भाव 2014 च्या मध्यापासून निम्म्यापेक्षा अधिक घसरले आहेत. भावातील घसरण रोखण्यासाठी उत्पादन घटविण्याच्या पर्यायावर मागील काही काळ चर्चा सुरू होती. मात्र याला ‘ओपेक‘मधील काही देशांचा आक्षेप होता. आता या निर्णयावर एकमत झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढून स्थिरता येणार आहे. 

अल्जायर्स : कच्च्या तेलाचे उत्पादन प्रतिदिन 7 लाख 50 हजार बॅरलपर्यंत कमी करण्याचा निर्णय ‘ओपेक‘ या तेल उत्पादक देशांच्या संघटनेने घेतला आहे. या निर्णयामुळे कच्च्या तेलाच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात गुरुवारी पाच टक्के वाढ झाली.

अल्जायर्स येथे सुरू असलेल्या ‘ओपेक‘च्या बैठकीत कोणताही तोडगा निघण्याची आशा आंतरराष्ट्रीय बाजाराला वाटत नव्हती. यातच अनपेक्षितपणे ‘ओपेक"ने तेल उत्पादन घटविण्याचा निर्णय घेतल्याने तेलाचे भाव वाढले. लंडनमध्ये ब्रेंट नॉथ सी क्रूड तेलाचा भाव प्रतिबॅरल 2.72 डॉलरने वाढून 48.69 डॉलरवर गेला. न्यूयॉर्कच्या वेस्ट टेक्‍सास इंटरमिजिएटचा भाव प्रतिबॅरल 2.38 डॉलरने वाढून 47.05 डॉलरवर पोचला. ‘ओपेक‘चे सदस्य देश जगभरातील कच्च्या तेलापैकी 40 टक्के उत्पादन करतात. नोव्हेंबरपासून त्यांनी प्रतिदिन 3.25 कोटी बॅरलपर्यंत उत्पादन कमी करण्यावर सहमती दर्शविली आहे. 

तेलाचे भाव 2014 च्या मध्यापासून निम्म्यापेक्षा अधिक घसरले आहेत. भावातील घसरण रोखण्यासाठी उत्पादन घटविण्याच्या पर्यायावर मागील काही काळ चर्चा सुरू होती. मात्र याला ‘ओपेक‘मधील काही देशांचा आक्षेप होता. आता या निर्णयावर एकमत झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढून स्थिरता येणार आहे. 

Web Title: OPEC will cut down on oil production

टॅग्स