सोनेरी घसरणीत गुंतवणुकीची संधी

सोनेरी घसरणीत गुंतवणुकीची संधी
Updated on

कोविड-१९ वरील लशीबाबत येत असलेल्या बातम्या आणि जागतिक पातळीवर सुधारत असलेली अर्थव्यवस्था, यामुळे गुंतवणूकदारांकडून सोन्याला मागणी कमी झाली. तसेच, नफेखोरी वाढल्याने सोन्याचा पुरवठा बाजारपेठेत वाढला. त्यामुळे ऑगस्ट २०२० मध्ये रेकॉर्ड पातळीवर पोचलेले सोने आता जवळपास सहा हजार रुपयांनी खाली आले आहे. सोन्याच्या भावात झालेली घसरण ही गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी आहे.

कोविड-१९मुळे गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था अनिश्चिततेमध्ये अडकली होती. त्यामुळेच, अनेक हेज फंडांनी सोन्याची खरेदी केली. मात्र, कोविड-१९ वरील लशीबाबत येत असलेल्या बातम्यांमुळे त्यांनी सोन्यात गुंतवणूक करणे कमी केले आहे. त्यामुळे बाजारात सोन्याचा पुरवठा वाढला आहे. परिणामी, सोन्याच्या भावावर दबाव येऊन भाव कमी होण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हेज फंड आणि गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी सोन्याची विक्री करण्यालाच पसंती दिली आहे. अर्थव्यवस्थेला गती मिळत असल्याने गुंतवणुकीच्या अन्य पर्यायांचा विचार होऊ लागला आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा डॉलरमधील भाव खाली आला आहे. तसेच, भारतीय रुपयाच्या तुलनेत डॉलर कमकुवत झाला आहे. त्यामुळेच, सोन्याचा भाव आगामी काळात प्रतिऔंस १७२० ते १७५० डॉलरदरम्यान येऊ शकतो. त्यामुळेच, सोन्यामध्ये सध्या गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे, असे वाटते. पुढील १८ ते २४ महिन्यांचा विचार केल्यास सोन्यातील गुंतवणूक वार्षिक नऊ टक्के परतावा देऊ शकते.

आता मजबूत होऊ शकणारा डॉलर व आंतरराष्ट्रीय बाजारात वाढू शकणाऱ्या डॉलरमधील सोन्याचा भाव हा भारतात पुन्हा एकदा सोन्याच्या भावात तेजी दाखवू शकतो. कोरोना जरी आटोक्यात आला तरी त्याच्या दुष्परिणामांमुळे मरगळलेली अर्थव्यवस्था व रोजगार परिस्थिती मूळ पदावर येण्यास पुढील ८ ते १० महिने लागतील. याचा परिणाम सोने पुन्हा तेजीत येण्यावर होऊ शकतो.

सोन्याच्या भावात चढ-उतार
मार्च ते ऑक्टोबर २०२० दरम्यान सोन्याच्या भावात चढ-उतार दिसले. मार्चमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रतिऔंस १५२० डॉलरवर होते आणि ऑगस्ट २०२० मध्ये उच्चांकी २०७० डॉलरवर पोचले होते. गेल्या एक महिन्यात सोन्याचा भाव प्रतिऔंस १९२० वरून १७७७ डॉलरपर्यंत खाली आला होता. मुंबईत ठोक बाजारात सोन्याचा प्रतिदहा ग्रॅमचा भाव ४९ हजार रुपये व आंतरराष्ट्रीय बाजारात १७८८ डॉलरजवळ आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ७४.०५ वर पोचले आहे. ऑक्टोबर २०२० च्या शेवटच्या आठवड्यात सोने प्रतिदहा ग्रॅम ५०,८०० रुपयांवर होते.

(लेखक कमॉडिटी तज्ज्ञ व पीएनजी अँड सन्सचे संचालक-सीईओ आहेत.) 

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.