क्रेडिट कार्डवरून ‘पेटीएम’वर पैसे हस्तांतरित केल्यास 2% चार्ज

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 मार्च 2017

क्रेडिट कार्डाद्वारे पेटीएम वॉलेटमध्ये पैसे हस्तांतरित करताना आम्हाला भरपूर खर्च करावा लागतो. जर ग्राहकाने उगाचच वॉलेटमध्ये पैसे टाकून ते पुन्हा बँक खात्यात टाकले तर त्याचे आम्हाला नुकसान होते.

नवी दिल्ली: पेटीएमने आता क्रेडिट कार्ड वापरुन मोबाईल वॉलेटमध्ये पैसे हस्तांतरित करणाऱ्या ग्राहकांना 2 टक्के व्यवहार शुल्क करण्याचा निर्णय घेतला आहे.

अनेक क्रेडिट कार्डधारकांनी मोफत क्रेडिट मिळविण्यासाठी कंपनीच्या मंचाचा फायदा घेत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. परंतु, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगमार्फत वॉलेटमध्ये पैसे टाकणाऱ्यांना कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

क्रेडिट कार्डाद्वारे पेटीएम वॉलेटमध्ये पैसे हस्तांतरित करताना आम्हाला भरपूर खर्च करावा लागतो. जर ग्राहकाने उगाचच वॉलेटमध्ये पैसे टाकून ते पुन्हा बँक खात्यात टाकले तर त्याचे आम्हाला नुकसान होते. ग्राहकांनी मोबाईल वॉलेटमधील रक्कम पेटीएम मंचावरील सेवांसाठी पैसे खर्च केल्यास आम्हाला फायदा होत असल्याचे सांगत 8 मार्चपासून व्यवहार शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे, असे पेटीएमने एका ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले आहे.

परंतु, क्रेडिट कार्डाद्वारे मोबाईल वॉलेटमध्ये पैसे टाकणाऱ्यांना दिली जाणारी कॅशबॅक सेवादेखील सुरु राहणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. मात्र, बँकेत पैसे परत हस्तांतरित करण्यासाठी शुल्क आकारले जात नाही. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात नोटाबंदीनंतर छोट्या व्यापाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने व्यवहार शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Paytm to now levy 2% fee on wallet recharge using credit card