सामान्य जनतेला दिलासा नाहीच; पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 9 December 2020

कोरोनाकाळात मागील काही दिवसांत तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या.

दिल्ली: देशातील तेलाच्या वाढत्या किंमतीचा फटका सामान्य जनेतेला बसत असतो. कोरोनाकाळात मागील काही दिवसांत तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. मागील 18 दिवसांत पेट्रोलचे दर जवळपास 4 टक्क्यांनी वाढले आहे, तर डिझेलचे दर 5 टक्क्यांनी वाढले आहेत. 

एका बाजूला कोरोनावरील लसीबद्दलच्या सकारात्मक बातम्या येत असल्याने अर्थव्यवस्था लवकरच रुळावर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहेत. याचा परिणाम म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे.

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर होत असतात. मागील काही दिवस देशात तेलाच्या किंमती स्थिर होत्या. पण 20 नोव्हेंबरनंतर तेलाच्या किमतीच्या दरातील चढउतार सुरु झाला.

हेही वाचा- महागाईमुळे उज्ज्वला योजनेकडे ग्राहकांनी फिरवली पाठ; दर वाढताच गॅसचे बूकिंग घटले

20 नोव्हेंबरपासून आतापर्यंत दिल्लीत पेट्रोल 2.65 रुपयांनी तर डिझेल 3.41 रुपये प्रतिलिटरने वाढले आहेत. मुंबईत मंगळवारी पेट्रोलच्या किंमती 90.34 रुपये तर डिझेलची किंमत 80.51 रुपये प्रति लिटर होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने घरगुती बाजारात तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. 

कशामुळे वाढल्या किंमती-
मागील बुधवारी बेंचमार्क ब्रेंट 1.6 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 48.61 डॉलरवर पोहचली आहे, जी मार्चनंतर सर्वात जास्त आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार, भविष्यात अजून तेलाच्या किंमती वाढणार आहेत.

हेही वाचा- Jet Airways दोन वर्षांनी पुन्हा दिसणार आकाशात; नव्या मॅनेजमेंटची घोषणा

केंद्र आणि राज्य सरकारकडून तेलावर कराचे दर खूप जास्त आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. सध्या पेट्रोलवर उत्पादन शुल्क आणि व्हॅट 63 टक्के आहे तर डिझेलमध्ये ते 60 टक्के आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: petrol and diesel prices increased consecutive days