पेट्रोल-डिझेल महागले

पेट्रोल-डिझेल महागले

मुंबई - जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलातील भाववाढीने ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. निवडणुकीच्या धामधुमीत चार दिवस रोखून धरलेल्या इंधन दरवाढीला तेल वितरकांनी गुरुवारी (ता.25) वाट मोकळी करून दिली. देशभरात पेट्रोल प्रतिलिटर नऊ पैसे आणि डिझेल दहा पैशांनी महागले. इराणवरील निर्बंध, खनिज तेलाची भाववाढ आणि रुपयाच्या अवमूल्यनाने नजीकच्या काळात इंधन दरवाढीचा भडका उडण्याची शक्‍यता आहे. 

खनिज तेलाच्या भाववाढीचे चटके तेल वितरक कंपन्यांना बसू लागले आहेत. भाववाढ करण्यावाचून पर्याय नसल्याने त्यांनी गुरुवारी इंधनदरात वाढ आली. पेट्रोलचा भाव 7 ते 9 पैशांनी वाढला, तर डिझेल दरात प्रतिलिटर 8 ते 10 पैशांची वाढ झाली. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या संकेतस्थळानुसार, मुंबईत पेट्रोलचा दर 78.59 रुपये आणि डिझेल 69.65 रुपये आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर 73.02 रुपये असून, चेन्नईत 75.79 आहे. डिझेल दिल्लीत 66.54 रुपये आणि चेन्नईत 70.26 रुपये आहे. कोलकत्यात पेट्रोलसाठी 75.04 रुपये आणि डिझेलसाठी 68.28 रुपये आहे. कच्च्या तेलातील भाववाढीने तेल वितरक कंपन्यांसाठी तेलाची आयात खर्चिक बनणार आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे बजेट कोलमडण्याची शक्‍यता आहे. 

कच्चे तेल सहा महिन्यांच्या उच्चांकावर 
अमेरिकेचे इराणवरील निर्बंध आणि तेलपुरवठ्यावरून निर्माण झालेल्या संकटाने जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या भावात गुरुवारी वाढ झाली. ब्रेंट क्रूडचा भाव 75.42 डॉलरवर गेला. गेल्या सहा महिन्यांतील हा उच्चांकी दर आहे. रशिया आणि ओपेक देशांनी उत्पादनावर मर्यादा घातल्यानंतर गेल्या महिनाभरात तेलाचा भाव वधारत होता. त्यातच इराणवरील निर्बंधामुळे आता पुरवठ्याबाबतची अनिश्‍चितता वाढली आहे. तेलाचा भाव स्थिर राहण्यासाठी ओपेक देशांकडून पुरवठा वाढवण्याची आवश्‍यकता असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले. 

सात महिन्यांपूर्वीचे दरवाढीचे सत्र 
सप्टेंबरमध्ये सलग 17 दिवस इंधन दरवाढीने ग्राहकांना घाम फोडला होता. देशात पेट्रोलचा दर 91 रुपयांवर गेला, तर डिझेलने 80 रुपयांच्या नजीक पोचले होते. त्या वेळी जागतिक बाजारात खनिज कच्च्या तेलाचा भाव प्रतिबॅरेल 78 डॉलरपर्यंत वाढला होता. सध्या जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढण्याचे प्रमाण बघता पुन्हा एकदा इंधन दरवाढीची झळ सोसावी लागण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com