पेट्रोल, डिझेलमध्ये जुलैनंतरची सर्वांत मोठी वाढ

पीटीआय
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

दिल्लीत आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 14 पैसे वाढ होऊन तो 72.17 रुपयांवर गेला. याचबरोबर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 15 पैसे वाढ होऊन तो 65.58 रुपयांवर गेला. 

नवी दिल्ली : सौदी अरेबियातील तेल शुद्धिकरण प्रकल्पावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर जागतिक पातळीवर खनिज तेलाचे भाव भडकले आहेत. यामुळे आज देशांतर्गंत इंधन दरवाढीचे चटके बसण्यास सुरवात झाली. 
 
दिल्लीत आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 14 पैसे वाढ होऊन तो 72.17 रुपयांवर गेला. याचबरोबर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 15 पैसे वाढ होऊन तो 65.58 रुपयांवर गेला. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 5 जुलैनंतर एकाच दिवसात झालेली ही सर्वांत मोठी वाढ आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इंधनावरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 2.50 रुपये वाढ केल्याने त्यावेळी एका दिवसात मोठी दरवाढ झाली होती. त्यानंतर आता एका दिवसांत ही मोठी दरवाढ नोंदविण्यात आली आहे. 

आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या भावात आज काही प्रमाणात घसरण झाली. खनिज तेलाचा भाव प्रतिबॅरल अर्धा टक्‍क्‍याने वाढून 68.86 डॉलरवर गेला. भारत एकूण गरजेपैकी 83 टक्के खनिज तेल आयात करतो. सौदी अरेबिया हा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा तेल पुरवठादार देश आहे. भारताने मागील आर्थिक वर्षात एकूण 207.3 दशलक्ष टन तेल आयात केले होते. यातील 40.33 दशलक्ष टन तेल सौदी अरेबियातून आयात करण्यात आले होते. 

भारताचे परिस्थितीवर लक्ष ः प्रधान 
""सौदी अरेबियातील परिस्थितीवर सरकारचे लक्ष आहे. जागतिक पातळीवर झालेली खनिज तेलाची भाववाढ चिंतेची बाब आहे. मात्र, सौदी अरेबियातून भारताला होणाऱ्या तेल पुरवठ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. सरकार आणि तेल कंपन्या सौदी अरेबियातील तेल कंपनी अरामकोसह तेथील सरकारच्या संपर्कात आहेत,'' अशी माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petrol, diesel price see steepest hike