पेट्रोल-डिझेलचा भडका; देशात एका शहरात दर @100₹

टीम ई-सकाळ
Monday, 25 January 2021

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 55 डॉलर प्रति बॅरल आहेत. ऑक्टोबर 2018मध्ये पेट्रोल-डिझेलचे दर सध्या असलेल्या दरांइतकेच होते.

नवी दिल्ली Latest News : सध्या पट्रोलचे दर वाढत चालल्यानं सर्व सामान्यांचे डोळे पांढरे व्हायची वेळ आलीय. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांत पेट्रोलच्या दरांवरून सरकारवर जोरदार टीका केलीय जातेय. केंद्र सरकारचं हसं होत असल्यासारखी परिस्थिती आहे. अशातच पेट्रोलचे दर 100 रुपये लिटर, झाल्याची बातमी देशातल्या एका शहरातून आली आहे. अर्थात हे शहर कोणतं याची सगळ्यांनाच उत्सुकता लागलीय.

आणखी वाचा - नेताजींच्या जागी अभिनेत्याच्या फोटोचं केलं अनावरण

आज सोमवारी, सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोलचे दर स्थिर राहिले. पण, ही बातमी सुखावणारी निश्चितच नाही. येत्या काही दिवसांत पेट्रोल शंभरी पार करेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. दुसरीकडे डिझेलही दराचे नवे उच्चांक गाठत आहे. सध्या दिल्लीत डिझेलचा दर 76 रुपये लिटर आहे. दिल्लीत पेट्रोल 85 रुपये 70 पैसे, मुंबईत 92 रुपये 28 पैसे लिटर आहे. कोलकात्यात पेट्रोल 87 रुपये 11 पैसे लिटर तर, चेन्नईत 88 रुपये 29 पैसे लिटर आहे. मुंबईत डिझेल 82 रुपये 66 पैसे प्रति लिटर आहे. कोलकात्यात 79 रुपये 48 पैसे तर चेन्नईत 81 रुपये 14 पैसे लिटर पेट्रोल आहे. जवळपास 29 दिवस पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर राहिल्यानंतर, आता पेट्रोलियम कंपन्यांनी हळू हळू दर वाढवण्यास सुरुवात केलीय. यात 6 जानेवारीपासून पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जानेवारी महिन्याचा विचार केला तर पेट्रोल 1 रुपये 99 पैशांनी महागले आहे.

आणखी वाचा - केंद्र सरकारची ग्रीन टॅक्सला मंजुरी, जुन्या गाड्यांवर भुर्दंड

पेट्रोल 100 रुपये लिटर पण कुठं?
देशात सध्याच्या घडीला सर्वांत महाग पेट्रोल एकाच शहरात मिळतं. राजस्थानातील श्रीगंगानगर या शहरात पेट्रोलचा दर 100 रुपये प्रति लिटर झाला आहे. या संदर्भात डीएनएने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, श्रीगंगानगरमध्ये साधे पेट्रोल 97 रुपये 76 पैसे प्रति लिटर आहे. तर, एक्स्ट्रा प्रिमियम पेट्रोल 100 रुपये 51 पैसे प्रति लिटर झाले आहे. राजस्थानात जयपूरमध्येही देशातील इतर शहरांच्या तुलनेत पेट्रोल महाग आहे. सध्या जयपूरमध्ये 93.22 रुपये दराने पेट्रोल विक्री होते. तर, डिझेलचा दर 85.29 रुपये प्रति लिटर आहे. श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल 89.46 रुपये लिटर आहे.

पेट्रोल-डिझेलवर कराचा बोजा
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 55 डॉलर प्रति बॅरल आहेत. ऑक्टोबर 2018मध्ये पेट्रोल-डिझेलचे दर सध्या असलेल्या दरांइतकेच होते. त्यावेळी कच्च्या तेलाचे दर 80 डॉलर प्रति बॅरलपर्यंत गेले होते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर तुलनेत कमी असले तरी, भारतात किरकोळ बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर भडकले आहेत. केंद्र सरकारकडून करात झालेली वाढ, हे या दर वाढी मागचे कारण असल्याचे बोलले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: petrol price 100 rupees per litre sriganganagar