महाराष्ट्रात आता पेट्रोलपंप रविवारी बंद

पीटीआय
बुधवार, 19 एप्रिल 2017

तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, तेलंगण, महाराष्ट्र आणि हरियाना या आठ राज्यांत 14 मेपासून सुमारे 20 हजार पेट्रोलपंप दर रविवारी 24 तास बंद राहतील.

चेन्नई : देशातील महाराष्ट्रासह आठ राज्यांतील पेट्रोलपंप 14 मेपासून दर रविवारी बंद राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनबचतीसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पेट्रोलपंप चालकांच्या संघटनेने मंगळवारी हा निर्णय घेतला. 

पेट्रोलपंप चालकांच्या महासंघाच्या समितीचे कार्याध्यक्ष सुरेश कुमार म्हणाले, ""मागे काही वर्षांपूर्वी आम्ही पेट्रोलपंप रविवारी बंद ठेवण्याची योजना आखली होती. तेल कंपन्यांनी या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी त्या वेळी केली होती. त्यामुळे त्या वेळी हा निर्णय मागे घेण्यात आला होता. आता मात्र, पेट्रोलपंप रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मन की बात' कार्यक्रमात पर्यावरण रक्षणासाठी इंधन बचतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत हा निर्णय घेण्यात आला आहे.'' 

कुमार हे तमिळनाडू पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष असून, ते म्हणाले, "तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, तेलंगण, महाराष्ट्र आणि हरियाना या आठ राज्यांत 14 मेपासून सुमारे 20 हजार पेट्रोलपंप दर रविवारी 24 तास बंद राहतील. केवळ तमिळनाडूमध्ये रविवारी पेट्रोलपंप बंद राहिल्याने 150 कोटी रुपयांचा फटका व्यवसायाला बसणार आहे; परंतु रविवारच्या इंधनविक्रीत दिवसेंदिवस घट दिसून येत असून, ती 40 टक्‍क्‍यांपर्यंत आली आहे.'' 

या निर्णयाला तेल कंपन्यांच्या पाठिंब्याबाबत विचारले असता कुमार यांनी लवकरच त्यांना हा निर्णय कळविण्यात येईल, असे सांगितले. एका पेट्रोलपंपावर सर्वसाधारणपणे 15 कर्मचारी असतात. सुटीच्या दिवशी आणीबाणीचा प्रसंग आल्यास एक कर्मचारी नेहमी कामावर असतो, असे त्यांनी नमूद केले. 

कमिशन वाढीबाबत लवकरच निर्णय 
तेल कंपन्यांकडून पेट्रोलपंपांना कमिशन वाढविण्याबाबत कुमार म्हणाले, ""संघटना याबाबत तेल कंपन्यांशी चर्चा करीत आहे. आमचा लढा सुरू आहे. संघटनेच्या सदस्यांची याबाबत बैठक होणार आहे. याबाबत आम्ही आमचा निर्णय लवकरच जाहीर करू.''

Web Title: Petrol Pump to stay close on Sunday in Maharashtra, Kerala, Tamilnadu, Andhra Pradesh, Haryana