नववर्षात पेट्रोल 100 ?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

नवी दिल्ली - देशभरातील इंधन दरवाढीचा भडका कायम आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या भावातील वाढ सुरूच राहिल्यास पुढील वर्षी जानेवारीपर्यंत पेट्रोलचा दर प्रतिलिटर शंभर रुपयांवर जाईल, अशी शक्‍यता सरकारी तेल कंपन्यांतील सूत्रांनी व्यक्त केली. 

नवी दिल्ली - देशभरातील इंधन दरवाढीचा भडका कायम आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या भावातील वाढ सुरूच राहिल्यास पुढील वर्षी जानेवारीपर्यंत पेट्रोलचा दर प्रतिलिटर शंभर रुपयांवर जाईल, अशी शक्‍यता सरकारी तेल कंपन्यांतील सूत्रांनी व्यक्त केली. 

आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या भावात प्रतिबॅरल एक डॉलर वाढ झाल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ विक्री दरात प्रतिलिटर ४० ते ५० पैसे वाढ होते. याचबरोबर डॉलरच्या मूल्यात एक रुपया वाढ झाल्यास इंधनदर प्रतिलिटर आणखी ६५ पैशांनी वाढतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचा भाव या वर्षाच्या अखेरीस अथवा पुढील वर्षाच्या सुरवातीला प्रतिबॅरल शंभर डॉलरवर जाण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. याचबरोबर रुपयातही घसरण होत आहे. यामुळे या वर्षाच्या अखेरीस अथवा पुढील वर्षी जानेवारीत पेट्रोल दर प्रतिलिटर शंभर रुपयांवर जाईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 

मुंबईत गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर १३ पैसे वाढ करण्यात आली. मुंबईत आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर ९०.३५ रुपये आणि डिझेलचा दर प्रतिलिटर ७८.८२ रुपयांवर गेला. दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे १४ व १२ पैसे वाढ करण्यात आली. दिल्लीत पेट्रोलचा दर ८३ रुपये आणि डिझेलचा दर ७४.२४ रुपयांवर गेला. चेन्नईत पेट्रोलचा दर ८६.२८ रुपये आणि डिझेलचा दर ७८.४९ रुपयांवर पोचला. कोलकत्यात पेट्रोल ८४.८२ रुपये आणि डिझेल ७६.०९ रुपयांवर गेला. 

पेट्रोल पंपचालकांची आतापासूनच तयारी 
पेट्रोलचा दर प्रतिलिटर शंभर रुपयांवर जाईल, या शक्‍यतेने पेट्रोल पंपचालकांनी आताच पूर्वतयारी सुरू केली आहे. पेट्रोल शंभर रुपयांवर गेल्यानंतर इंधन वितरित करणाऱ्या यंत्रांमध्ये तीन आकडी दर दिसावेत, यासाठी ही यंत्रे अद्ययावत करण्यास पेट्रोलपंप चालकांनी सुरवात केली आहे. याचबरोबर पेट्रोल पंपचालक डिझेलचा दर तीन आकडी होईल, हे गृहित धरूनही यंत्रे अद्ययावत करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petrol Rate 100 Rupees in new year