PF Interest : PF वर किती व्याज मिळणार? ; ईपीएफओची बैठक सुरू, आज होणार मोठी घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PF Interest

PF Interest : PF वर किती व्याज मिळणार? ; ईपीएफओची बैठक सुरू, आज होणार मोठी घोषणा

प्रोव्हिडेंट फंड म्हणजेच PF अकाउंट होल्डर्स आपल्या जमा रकमेवर मिळणाऱ्या व्याजाची वाट पाहत असतात. त्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण, भविष्य निर्वाह निधीत जमा झालेल्या रकमेवर किती व्याज मिळणार हे आज ठरविण्यात येणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक कालपासून (सोमवार) सुरू झाली आहे. या बैठकीतील महत्त्वाच्या मुद्द्यांची घोषणा आज केली जाऊ शकते.

ईपीएफओ पीएफ खातेधारकाच्या खात्यात जमा झालेली रक्कम अनेक ठिकाणी गुंतवतो. या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग खातेदारांना व्याजाच्या स्वरूपात दिला जातो.

ईपीएफओच्या बैठकीत आर्थिक वर्ष २२-२३ साठी भविष्य निर्वाह निधीत (पीएफ) जमा झालेल्या रकमेवरील व्याजदराबाबत चर्चा होईल. चालू वर्षासाठी आर्थिक वर्षासाठी सरकारने पीएफवर ४३ वर्षांतील नीचांकी दर निश्चित केला आहे. जो ८.१ टक्के इतका आहे.

काल दुपारपासून सुरू असलेल्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या दोन दिवसीय बैठकीत ईपीएफवरील व्याज दराबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, व्याजदरांमध्ये कोणताही बदल होणार नसून ते सध्याच्या पातळीवरच राहतील, असे सांगण्यात येत आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ची स्थापना 1952 मध्ये झाली. त्यानंतर पीएफ खात्यावर मिळणारा व्याजदर तीन टक्के होता, त्यानंतर तो सातत्याने वाढत आहे.

सध्या EPFO कर्जाच्या पर्यायांमध्ये 85 टक्के गुंतवणूक करते. यामध्ये सरकारी सिक्युरिटीज बाँड्सचाही समावेश आहे. उर्वरित 15 टक्के ETF मध्ये गुंतवले जातात. यानंतर, कर्ज आणि इक्विटीच्या कमाईच्या आधारावर व्याजदर निश्चित केला जातो.

2015-16 मध्ये, EPFO ने इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. ज्यामध्ये पहिल्या वर्षी त्याच्या वाढीव निधीच्या 5 टक्के, नंतर 10 टक्के आणि नंतर 15 टक्के गुंतवणूक केली. सरकारी आकडेवारीनुसार, EPFO ने 1.7 लाख कोटी रुपयांची एकत्रित गुंतवणूक केली आहे. ज्यापैकी 31 मार्च 2022 पर्यंत 22,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरीत केली आहे.