बचतीचा गुणाकार!

आर्थिक साक्षरता ही फक्त आपण कमवायला लागल्यावरच शिकायला हवी, असे काही नाही. खरे तर हा आपल्या शिक्षणपद्धतीचाच भाग असायला हवा, हे वारंवार लोकांना पटवून देण्याची गरज आहे.
Economy
Economysakal
Summary

आर्थिक साक्षरता ही फक्त आपण कमवायला लागल्यावरच शिकायला हवी, असे काही नाही. खरे तर हा आपल्या शिक्षणपद्धतीचाच भाग असायला हवा, हे वारंवार लोकांना पटवून देण्याची गरज आहे.

आर्थिक साक्षरता ही फक्त आपण कमवायला लागल्यावरच शिकायला हवी, असे काही नाही. खरे तर हा आपल्या शिक्षणपद्धतीचाच भाग असायला हवा, हे वारंवार लोकांना पटवून देण्याची गरज आहे. पैसे न कमवता आपल्यावर होणारे खर्च कमी करूनही आपण पैशांची बचत करू शकतो. पैशांची काटकसर करायची असेल तर खर्चाचे नीट नियोजन हवे. आपण या नियोजनाचे स्किल्स जेवढे वाढवू तेवढी बचत वाढण्यास मदत होते. आपण पुढे पैसे कमवायला लागल्यावर या बचतीच्या सवयी परिसाप्रमाणे आपल्याकडे येणाऱ्या पैशांना स्पर्श करतात आणि योग्य गुंतवणुकीद्वारे त्याचे सोने करतात.

आपल्यापैकी बऱ्याच जणांवर लहानपणापासूनच बचतीचे संस्कार घडत असतात. आपल्याला मिळालेली पिगी बॅंक असो, आई-वडील, आजी-आजोबा यांची चर्चा, पैशांची देवाणघेवाण, आईचे पैसे वाचवण्याच्या, तसेच त्या ठेवण्याच्या वेगवेगळ्या क्लृप्त्या, घरातल्या मोठ्या लोकांच्या चालणाऱ्या वेगवेगळ्या भिशी प्रकार आदी बाबी पैसे बचतीचेच पूर्वीपासून चालत आलेले संस्कार आहेत. आपण पुढे पैसे कमवायला लागल्यावर या बचतीच्या सवयी परिसाप्रमाणे आपल्याकडे येणाऱ्या पैशांना स्पर्श करतात आणि योग्य गुंतवणुकीद्वारे त्याचे सोने करतात.

बऱ्याच युवक-युवतींना ट्रेनी किंवा अगदी सुरुवातीला मिळेल ते काम करताना पाच-दहा हजार पगार मिळतो. अशात घरची जबाबदारी, पूर्वीची काही कर्ज किंवा जगण्याच्या लढाईत बचत, गुंतवणूक सर्वच आवाक्याबाहेर वाटतात. आर्थिक चणचण आणि तारांबळ उडत राहते. पुढे यातील काहीजण चांगली आर्थिक प्रगती करतात. लाखो रुपयेही कमवायला लागतात. तरीपण तसाच ताणतणाव, तशीच पैशांची ओढाताण अन्‌ चणचण त्यांना जाणवत राहते. खरं तर यालाच आर्थिक निरक्षरता असे म्हणतात. आता हा आर्थिक साक्षरता विषय वयाच्या कोणत्याही टप्प्यावर शिकायला आणि इंप्लिमेंट करायला सुरुवात केली तरी त्याचा फक्त आणि फक्त फायदाच आहे.

आर्थिक साक्षरतेचा सर्वात महत्त्वाचा आणि सतत उजळणी करत रहावी असा मुद्दा म्हणजे बचत. आज आपण काही साधेसोपे असे नऊ मार्ग पाहू.

१. मोठेपणा टाळा :

आपण जसे आहोत तसेच वागलो आणि उगीचचा ‘शोऑफ’ टाळता आला की आयुष्य खुप हलके, शांत आणि सोपे होते. जेवढा शक्य असेल त्यापेक्षा थोडा कमीच खर्च करावा. भपका आणि प्रसिद्धीच्या नादी लागून आर्थिक ताण घेण्यात मानसिक आणि आर्थिक दोन्ही पातळ्यांवर नुकसानच असते. साधेपणात मोठे सुख तर असतेच, पण खर्चही फार कमी होतो. गाड्यांसाठी, लग्नकार्यासाठी, हौसमौजेसाठी जेवढे कमीत कमी कर्ज घेता येईल ते चांगले. कारण अशा पद्धतीची कर्ज तुम्ही श्रीमंत होण्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा असतात.

२. जमा-खर्च मांडा :

दिवसभराचा ‘जमा-खर्च’ लिहायला फक्त पाच-दहा मिनिटे लागतात; पण त्यामुळे ‘संपूर्ण आयुष्याचे गणित’ कायम हिशोबात राहते.

जमा-खर्च लिखित, चोख ठेवल्याने -

आपोआप क्रेडिट वाढते.

परिणामी गुडविलही वाढते.

आणि कधी चूक झाली तरी सिंहावलोकन करताना नक्की मदत होते.

३. इतरांशी तुलना बंद करा

जसे प्रत्येकाच्या बोटांचे ठसे वेगळे असतात तसेच प्रत्येकाचे आयुष्यही वेगळेच असते. उगीच एकमेकांशी तुलना करत बसू नये. यश आणि पैसा हे हातांवरील रेषांपेक्षा आपल्या बुद्धीवर, कष्टावर, मनगटातील ताकदीवर आणि आपल्या इतर लोकांशी असलेल्या वागणुकीवर जास्त अवलंबून असते. तुलना, इर्षा आणि सततचे गॉसिप्स यापेक्षा ‘आत्मचिंतन आणि स्वत:मधला बदल’ प्रगतीसाठी, मानसिक आरोग्यासाठी कधीही उत्तम. तुलना टाळता आली की लहानसहान गोष्टींतला आनंद आयुष्य हलके करतो. कर्जबाजारीपणाच्या प्रमुख कारणांमध्ये इतरांशी तुलना हे महत्त्वाचे कारण आहे.

४. Don’t Replace - Repair it

वस्तू बिघडली की ती लगेच टाकून देऊ नये. ती दुरुस्त करून पुन्हा वापरायला हवी. लगेच, ताबडतोप त्याची रिप्लेसमेंट हा पैशांचा अपव्यय आहे. बऱ्याचदा आपण म्हणतो की हौसेला मोल नसते; पण त्या हौसेपायी खूपच खर्च होत असेल तर मग मात्र तो ट्रॅप आहे आणि त्यातून आपण वाचायला हवे. ॲानलाईन युगात तसेच या फास्ट जगात रिपेयरिंग हा प्रकार जवळपास नष्ट होत चाललाय; पण हा पर्याय जर आपण वापरला तर बरीच मोठी बचत होते.

५. अत्यंत गरज असेल तरच नवी खरेदी करा, नाहीतर भाडेतत्त्वावर घ्या :

गरजा कमी केल्या की पैसा तर वाचतोच, पण आनंदही वाढतो. घर असो, गाडी असो किंवा एखादी नवी वस्तू, पूर्ण हिशोब करून त्याची खरेदी व्हायला हवी. त्याचे व्याज, पुढे त्या खरेदीमुळे होणारा फायदा, उपयोग या सर्वांचा सर्वांगाने सुरुवातीलाच विचार व्हावा. भावनेच्या भरात कोणतीही खरेदी करू नये. तसेच टीव्ही, वर्तमानपत्र, समाजमाध्यमातील मतप्रवाह किंवा जाहिरातीच्या प्रभावाखाली असताना कोणतेच खरेदीचे निर्णय घेऊ नयेत.

६. वाटाघाटीत तरबेज व्हा :

वाटाघाटींची कौशल्ये नीट शिकायला हवीत. आयुष्यात जवळपास प्रत्येक दिवशी याची गरज पडते. ‘गरजेची वस्तू’ खरेदी करायची म्हणजे खर्च आला. योग्य दर, उत्तम दर्जा तसेच ती नक्की कोणाकडून घ्यायची, हे नीट समजून उमजून घेतले तर मोठी बचत होते. निगोसेशन स्कील्सवर आयुष्याचे मोठे गणित अवलंबून असते. ॲानलाईन युगात समोरासमोरचे बार्गेनिंग कमी होतेय; पण खऱ्या आयुष्यात ते खूप गरजेचे असते. आपल्या तरुण पिढीने ते नीट आत्मसात करायला हवे.

७. घरचाच आहार/जेवण/ पाणी घ्या :

सतत बाहेरचे जेवण, चटपटीत खाण्याच्या सवयी यामुळे मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होतात. हेच जर शक्य असेल तर घरून डबा घेऊन बाहेर पडलो तर वायफळ खर्च कमी होतो.

मी स्वतः अगदी दहा-बारा वर्षांपूर्वीपर्यंत ब्रॅंडेड पाण्याच्या बाटल्यातून पाणी प्यायचो. त्याची एक वेगळीच क्रेजही वाटायची. त्यानंतर एकदा युरोपला जाणे झाले आणि सोबतीला असलेले एक गोरे सहकारी टॅप वॉटर सोबत बाटलीत भरून घेताना दिसले. ते दिवसभर पुरेल इतका साठा कारमध्ये घेऊन फिरत. मीही नंतर भारतात परतल्यावर घरूनच पाण्याच्या बाटल्या सोबत ठेवतो ते आजपर्यंत. यामुळे पैशांची बचत तर होतेच शिवाय माझ्याकडून होणारा प्लास्टिकचा कचराही कमी होतो.

(हॅाटेलिंग आणि बाहेर जेवणाबाबतीत मला स्वतःलाच हा सल्ला पाळणे कठीण जाते. बऱ्याचदा टूरवर असल्याने तसेच मलाच स्वतःला वेगवेगळे खाद्यपदार्थ आवडत असल्याने माझ्याकडून या बाबतीत चुका होतात. त्याबद्दल मनापासून क्षमस्व) पण हे सर्व करत असताना या खवय्येगिरीचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ नये, याची दक्षता मी घेण्याचा प्रयत्न करत असतो.

८. मॅाल-सुपरमार्केटमध्ये यादी करूनच खरेदी करा :

यादी करून खरेदी करायची सवय ही मोठी बचत तर करतेच तसेच वेळही वाचवते. बऱ्याचदा सुपरमार्केट आणि मॅालमधील विनाकारण केलेली खरेदी पाहून नंतर ‘खरच याची आपल्याला गरज होती का?’ असे प्रश्न पडतात. जे लोक सुगीच्या दिवसात फक्त मौज-मजा, छानछौकीत, ऐशोआरामात राहतात ते पुढे एक ना एक दिवस खर्च केलेल्या पैपैचा अपव्यय आठवून कपाळावर हात मारून घेतात. या अशा प्रकारची विनाकारण खरेदी टाळली तर मन आणि भावनांवर नियंत्रण मिळवणे सोपे जाते.

९. प्रत्येक बिल/हिशोब तपासूनच घ्या :

पैशांच्या व्यवहाराबाबत भावनेच्या भरात असताना (दुःख, भीती वा आनंदी) हिशेब पाहणे अजिबात चुकवू नये. तेव्हाच आपली फसवणूक होण्याची जास्त शक्यता असते. फक्त स्मरणशक्तीवर अजिबात विश्वास न ठेवता प्रत्येक गोष्ट व्यवस्थित चेक करून मगच पैसे द्यावेत वा घ्यावेत. यामुळे चांगली शिस्त तर लागतेच शिवाय समोरील व्यक्तीही आपल्यासोबत भविष्यात व्यवहार करताना अधिक काळजी घेते.

आपण केलेली बचतच आपल्याला खरा आत्मविश्वास देते. त्याद्वारे गुंतवणूक आणि पैशांचा गुणाकार सुरू होतो. यामुळे आपण खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण तर बनतोच शिवाय आपल्या वागण्याबोलण्यातून ते पदोपदी जाणवते.

बचतीचे अजून खूप-अनंत मार्ग आहेत, या आधी त्यावर बरेच लिखाण झालेय आणि यापुढेही ते येतच राहील.

टिप : पैशांची योग्य बचत, नियोजन, वापर आणि गुंतवणूक करत असताना माणुसकीत मात्र अजिबात बचत करू नका. ती एकमेकांना भरभरून द्या. माणुसकी जपा. त्यामुळे आनंद तर मिळतोच, पण शांत झोपही लागते. भरपूर पुस्तकं वाचा, त्यावर चिंतन करा. इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करा, मदत करा. बौद्धिक तसेच आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग शोधायला मदत करावी.

आपणास आणि आपल्या परिवारास येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!

wankhedeprafulla@gmail.com

(लेखक प्रख्यात केल्विन आणि लिक्विगॅस या औष्णिक ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com