कर्जरोख्यांवर व्याज देण्यात 'डीएसकें'कडून कुचराई

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

या कर्जरोख्यांमधील तीन वर्षे मुदतीच्या रोख्यांची मुदतपूर्ती येत्या सप्टेंबरमध्ये होणार आहे.

पुणे : 'सेबी'च्या नियमानुसार आपल्या कर्जरोख्यांवर (एनसीडी) देय असलेले व्याज डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड ही कंपनी संबंधित तारखेस देऊ शकलेली नाही, अशी माहिती कॅटलिस्ट ट्रस्टशिप लिमिटेडच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आली.

कंपनी कायदा अधिनियम 2013 आणि 'सेबी'च्या 1993 च्या अधिनियमानुसार कर्जरोखे विश्‍वस्त (डिबेंचर ट्रस्टी) म्हणून कॅटलिस्ट ट्रस्टशिप लि. काम पाहात आहेत. डिबेंचर्स वितरित करताना जाहीर केलेल्या नियमानुसार मासिक आणि तिमाही व्याज (पर्याय क्रमांक एक) आणि (पर्याय क्रमांक चार) एक जुलै 2017 रोजी देणे अपेक्षित होते. मात्र, निर्धारित तारखेला हे व्याज देऊ शकत नसल्याचे कंपनीने तीन जुलै 2017 रोजी ई-मेलद्वारे कळविले आहे, असे कॅटलिस्ट ट्रस्टशिप लि.तर्फे स्पष्ट करण्यात आले.

या कर्जरोख्यांमधील तीन वर्षे मुदतीच्या रोख्यांची मुदतपूर्ती येत्या सप्टेंबरमध्ये होणार आहे. त्या वेळी संबंधित गुंतवणूकदारांना कंपनीकडून मुद्दलाची रक्कमही देय होणार आहे. याबाबत 'डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स'चे अध्यक्ष डी. एस. कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या संदर्भात आर्थिक तरतूद केली जात असल्याचे 'सकाळ'ला कळविले आहे.

Web Title: pune news dsk developers default ncd debentures