देशातील उद्योजक करताय 'या' नवीन क्षेत्रात गुंतवणूक 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

देशातील उद्योजक आता गुंतवणुकीसाठी नवीन क्षेत्रात संधी शोधत आहेत. टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी पुन्हा एकदा स्टार्टअपवर विश्वास दाखवला आहे.

मुंबई: देशातील उद्योजक आता गुंतवणुकीसाठी नवीन क्षेत्रात संधी शोधत आहेत. टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी पुन्हा एकदा स्टार्टअपवर विश्वास दाखवला आहे. रतन टाटा यांनीच दिलेल्या माहितीनुसार, पुणेस्थित इलेक्ट्रिक दुचाकी स्टार्टअप कंपनी टॉर्क मोटर्समध्ये त्यांनी गुंतवणूक केली आहे. येत्या काही महिन्यात या कंपनीची पहिली इलेक्ट्रिक बाईक टी 6 एक्स भारतीय बाजारात दाखल होणार आहे.

टॉर्क मोटर्स ई बाईक कंपनी आहे. विशेष म्हणजे देशातील टॉर्क ही देशातील पहिली ई बाईक कंपनी असून त्यांनी त्यांची बाईक देशात सर्वप्रथम लाँच करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्या अगोदरच रिव्होल्टने त्यांची ई बाईक लाँच केल्याने ते शक्य झाले नाही. ते सादर करत असलेल्या टी 6 एक्सला लिथियम वापरण्यात आली आहे. एकदा चार्ज केल्यावर ही बाईक 100 किमी अंतर धावते आणि तिचा टॉप स्पीड ताशी 100 किमी आहे. एका तासात या बाईकची बॅटरी 80 टक्के चार्ज होते.

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा हे मागील काही वर्षांपासून नवउद्यमींना आर्थिक बळ देत आहेत. 2012 मध्ये निवृत्त झाल्यानंतर रतन टाटा यांनी ई-कॉमर्स कंपनी स्नॅपडिलमधून वैयक्तिक गुंतवणुकीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी देशात विकसित असलेल्या स्टार्टअप संस्कृतीचे पोषण करताना, विविध नवउद्यमी उपक्रमांना आर्थिक पाठबळ दिले आहे. यामध्ये अर्बन लॅडर, ब्लूस्टोन आण कारदेखो डॉट कॉम यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. तसेच महिलांच्या वस्त्रांची ऑनलाईन विक्री करणा-या ‘कार्याह’ या फॅशन पोर्टलमध्ये देखील त्यांनी गुंतवणूक केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratan Tata invests in Torque Motors