RBI चे नवे बाँड एक जुलैपासून बाजारात, जाणून घ्या काय आहे खास

RBI
RBI

पुणे, ता. 27 ः रिझर्व्ह बँकेने महिनाभरापूर्वी 7.75 टक्के व्याजदराचे सेव्हिंग्ज बाँड्‌स बंद केले होते. त्यानंतर आता त्याच्या जागी आता एक जुलै 2020 पासून 'फ्लोटिंग' व्याजदराचे सेव्हिंग्ज बाँड्‌स 2020 (टॅक्‍सेबल) बाजारात येणार आहेत. सुधारित स्वरुपातील बाँड्‌सदेखील सात वर्षे मुदतीचे असतील आणि त्याचा व्याजदर दर सहा महिन्यांनी (रिसेट) ठरविला जाणार आहे. यासाठी प्रचलित राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राच्या (एनएससी) व्याजदरापेक्षा 0.35 टक्‍क्‍यांनी अधिक व्याजदर ठेवला जाणार आहे. 1 जुलै ते 31 डिसेंबर 2020 या पहिल्या सहामाहीसाठी तो 7.15 टक्के जाहीर केला गेला आहे. त्या पुढे तो दर सहा-सहा महिन्यांनी बदलला जाऊ शकतो.  रिझर्व्ह बॅंकेने या नव्या बाँड्‌सची घोषणा एका अधिसूचनेद्वारे केली आहे. 

निवासी भारतीय व हिंदू अविभक्त कुटुंब (एचयूएफ) यांना यात गुंतवणूक करता येणार आहे. किमान एक हजार रुपये आणि त्यानंतर एक हजाराच्या पटीत कितीही गुंतवणूक करता येणार आहे. रोखीने जास्तीत जास्त 20 हजार रुपये आणि त्यापेक्षा अधिक गुंतवणुकीसाठी चेक, ड्राफ्ट वा इलेक्‍ट्रॉनिक ट्रान्स्फर पद्धतीचा वापर करावा लागणार आहे. नव्या बाँड्‌समध्ये फक्त नॉन-क्‍युम्युलेटिव्ह पर्यायाद्वारे सहामाही व्याज दिले जाणार आहे. 31 डिसेंबरपर्यंतचे व्याज 1 जानेवारीला आणि 30 जूनपर्यंतचे व्याज 1 जुलैला दिले जाणार आहे. व्याजाचे उत्पन्न करपात्र असेल. स्टेट बँकेसह इतर राष्ट्रीयीकृत बँका, आयडीबीआय बँक, काही खासगी बँकांच्या माध्यमातून त्याची विक्री केली जाणार आहे.

नव्या फ्लोटिंग आरबीआय बाँड्‌सची ठळक वैशिष्ट्ये
योजनेचे नाव - फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बाँड्‌स २०२० (टॅक्‍सेबल). केंद्र सरकारच्या वतीने रिझर्व्ह बॅंक हे कर्जरोखे (बाँड्‌स) जारी करीत असल्याने यांना ‘आरबीआय बाँड’ असे म्हटले जाते. 

गुंतवणुकीस कोण पात्र? - निवासी भारतीय व हिंदू अविभक्त कुटुंब (एचयूएफ) पात्र असतील. पण अनिवासी भारतीय (एनआरआय) या बाँड्‌समध्ये गुंतवणूक करू शकत नाहीत.

मुदत - सर्वसामान्यांसाठी सात वर्षे. मात्र, ६० ते ७० वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना सहा वर्षांनंतर, ७० ते ८० वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना पाच वर्षांनंतर, तर ८० वर्षांवरील अतिज्येष्ठ नागरिकांना चार वर्षांनंतर (व्याजदरात थोडी कपात करून) पैसे परत मिळू शकतात.

व्याजदर - पहिल्या सहामाहीसाठी ७.१५ टक्के, नंतर दर सहा महिन्यांनी ‘रिसेट’ केला जाणार. ‘एनएससी’चा व्याजदर हा ‘बेसरेट’ धरून या बाँड्‌सचा व्याजदर निश्‍चित केला जाणार. ‘एनएससी’चा त्या-त्या वेळचा प्रचलित दर अधिक ०.३५ टक्के अशा पद्धतीने व्याजदर ठरविला जाणार.   

गुंतवणूक मर्यादा - किमान एक हजार रुपये आणि कमाल कोणतीही मर्यादा नाही. रोखीने जास्तीत जास्त २० हजार रुपये आणि त्यापेक्षा अधिक गुंतवणुकीसाठी चेक वा ड्राफ्ट द्यावा लागणार.

कोठे मिळतात? - स्टेट बॅंकेसह काही राष्ट्रीयीकृत बॅंका, आयडीबीआय बॅंक, काही खासगी बॅंका (उदा. आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफसी बॅंक, ॲक्‍सिस बॅंक). शिवाय काही ब्रोकर वा गुंतवणूक योजनांचे वितरक वा प्रतिनिधी.

सुरक्षितता - हे बाँड्‌स सुरक्षिततेच्या आघाडीवर उत्तम समजले जातात. पण व्याजाचे उत्पन्न करपात्र असून, उद्‌गम करकपात (टीडीएस) होते, हे लक्षात ठेवले पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com