डेटिंग वाढतंय; अंतर्वस्त्रांची विक्री कमी होतेय याचाच अर्थ...

वृत्तसंस्था
Monday, 19 August 2019

इनरवेअर आणि आर्थिक मंदी यांचा संबंध आहे असे सांगितल्यास कदाचित हसू येईल. मात्र जगभरातील इनरवेअर कमी झालेली विक्री आणि आर्थिक मंदी पुन्हा चर्चेत आली आहे

मुंबई :  इनरवेअर आणि आर्थिक मंदी यांचा संबंध आहे असे सांगितल्यास कदाचित हसू येईल. मात्र जगभरातील इनरवेअर कमी झालेली विक्री आणि आर्थिक मंदी पुन्हा चर्चेत आली आहे. अमेरिकेमधल्या सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हचे माजी अध्यक्ष अ‍ॅलन ग्रीनस्पॅन यांनी अंडरवेअरच्या विक्रीबदद्ल एक निर्देशांक तयार केला आहे. याला 'मेन्स अंडरवेअर इंडेक्स' असे म्हटले जाते. या इंडेक्सनुसार आर्थिक मंदी येत असल्याचे संकेत सध्या मिळत आहेत. 

ऑटो क्षेत्रानंतर आता इतर क्षेत्रातही मंदीची व्याप्ती वाढत आहे. सरलेल्या तिमाहीत इनरवेअर आणि डायपरच्या विक्रीत मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. अमेरिकेबरोबरच भारतीय बाजारात देखील विक्री कमी झाली आहे. 'मेन्स अंडरवेअर इंडेक्स'नुसार इनरवेअरची विक्री कमी झाल्यास देशाची अर्थव्यवस्था मंदीच्या दिशेने पाऊल उचलत असल्याचे लक्षण असते. शिवाय जेव्हा विक्री जोरात असते त्यावेळी अर्थव्यवस्था सुरळीत असल्याचे लक्षण असते असे 'मेन्स अंडरवेअर इंडेक्स' थेअरीमध्ये सांगण्यात आले आहे. 

'मेन्स अंडरवेयर इंडेक्स'ने 1990, 2001 आणि 2007 मध्ये अमेरिकेत आलेल्या मंदीबद्दल संकेत दिले होते. मंदीच्या काळात खर्चात कपात केली जाते. त्यामुळे लहान मुलांच्या डायपर्स विक्री देखील कमी होते. पालक दिवसातून कमी वेळा डायपर बदलतात. मात्र यामुळे  लहान मुलांना त्वचेचे विकार होतात. मग डायपर रॅश क्रीमची विक्री वाढते असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. 

कंपन्यांच्या गारमेंटस् विक्रीमध्ये सध्या घसरण झाली असून चार मोठ्या इनरवेअर कंपन्यांच्या विक्रीत घसरण झाली आहे. 
'या' कंपन्यांच्या विक्रीमध्ये घसरण:
-व्हीआयपी अंडरवेअरच्या विक्रीत 20 टक्क्यांची घट 
-लक्स विक्री मोठी घट 
-डॉलर इंडस्ट्रीजच्या विक्रीत 4 टक्क्यांची घट 
- फक्त पेज इंडस्ट्रीजच्या जॉकी ब्रँडच्या विक्रीत वाढ नोंदविण्यात आली आहे. 

 डेटिंग इंडिकेटर
मेन्स अंडरवेअर इंडेक्सप्रमाणेच डेटिंग इंडिकेटर देखील मंदीचे संकेत देते आहे. अमेरिकेतील Match.com या डेटिंग साइटने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा कंपन्या अडचणीत असतात त्यावेळी या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांचे डेटिंगचे प्रमाण वाढते. लोक आपल्यावरील ताण कमी करण्यासाठीकुणाशीतरी बोलण्यासाठी डेटिंग साइटचा वापर करतात. अमेरिकेत 2008 मध्ये डेटिंग साइटवर बऱ्याच नोंदणी झाल्या होत्या. शिवाय 2001 मध्येही वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाल्यानंतरदेखील  Match.com या डेटिंग साइटला सर्वाधिक व्हिझिट झाल्या होत्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: recession may arrive in coming days as undergarments sale falldown give signal related to the men underwear index