
गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ५९,७९३ अंशांवर तर ‘निफ्टी’ १७,८३३ अंशांवर बंद झाला.अमेरिकी शेअर बाजाराचा निर्देशांक ‘डाऊ जोन्स’ने गेल्या शुक्रवारी ३७७ अंशाची तेजी दर्शविल्याने या आठवड्याची सुरवात तेजीने होऊ शकते. अल्पावधीच्या आलेखानुसार ‘सेन्सेक्स’ची ५७,३६७ तसेच ‘निफ्टी’ची १७,७६७ ही महत्त्वाची आधार पातळी आहे. सध्या निर्देशांक मर्यादित पातळ्यांमध्ये झोके घेत असतानादेखील काही कंपन्यांचे शेअरमात्र उलाढालीत लक्षणीय वाढ दर्शवत आलेखानुसार दर्शवत तेजीचा कल दाखवत आहेत.
अशाप्रकारे तेजीचा कल दर्शविणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत ओळखून व्यवहार करणे योग्य ठरू शकते. सध्या अॅस्ट्रल, एलजी बालकृष्णन अँड ब्रदर्स, विनती ऑरगॅनिक्स, वेदांत फॅशन्स, स्टेट बँक ऑफ इंडिया, व्हीनस पाईप्स आणि ट्यूब्स आदी अनेक कंपन्यांचे शेअर आलेखानुसार तेजीचा कल दर्शवत आहेत.
अॅस्ट्रल पाईप लिमिटेड (शुक्रवारचा बंद भाव रु. २५९४)
अॅस्ट्रल पाईप लिमिटेड ही कंपनी सीपीव्हीसी पाइपिंग निर्मिती आणि वितरण विभागामध्ये एक आघाडीची कंपनी आहे. कंपनी अॅडेसिव्ह (वस्तू चिकटविण्याचे द्रव्य) व्यवसायातही विस्तार करत आहे. व्यवसायवाढीचा मार्ग सुरू ठेवण्यासाठी ज्या भागात उपस्थिती नाही अशा पूर्वप्रदेशात अधिक वितरक जोडून विस्तार करण्याकडे कंपनीने लक्ष केंद्रित केले असून, प्रादेशिक पातळीवर आणखी गोदामे आणि डेपो उघडण्याच्या विचारात आहे. कंपनी प्लंबिंग, शेती, उद्योग, फायर स्प्रिंकलरसाठी पाईप्स आणि फिटिंग्ज तयार करते. कर्जाचे प्रमाण कमी ठेऊन व्यवसायात गुंतविलेल्या भांडवलावर सातत्याने २० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत या कंपनीने सेल्स तसेच प्रॉफिटमध्ये गेल्या १० वर्षात प्रतिवर्ष १५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ दर्शवत व्यवसाय वृद्धी केली आहे.
सध्या मध्यम अवधीच्या आलेखानुसार अॅस्ट्रल लिमिटेड या कंपनीच्या शेअरने जानेवारी २०२२ पासून रु.२,५२४ ते रु.१,५८१ या पातळ्यांमध्येच चढउतार दर्शविल्यानंतर गेल्या आठवड्यात रु.२,५२४ पातळीच्या वर रु.२,५९३ ला बंद भाव देऊन मध्यमवधीसाठी तेजीचे संकेत दिले आहेत.
विनती ऑरगॅनिक्स (शुक्रवारचा बंद भाव रु.२३४२)
विनती ऑरगॅनिक्स लिमिटेडची स्थापना १९८९ मध्ये खास सेंद्रिय रसायने तयार करण्यासाठी करण्यात आली. विनती ऑरगॅनिक्स विशेष ऑर्गेनिक इंटरमीडिएट्स आणि मोनोमर्सच्या निर्मितीमध्ये गुंतलेली आहे. आयसोब्युटील बेंझिन आणि २-अॅक्रिलामिडो २- मिथाइलप्रोपेन सल्फोनिक अॅसिड या रसायनांची ही जगातील सर्वांत मोठी उत्पादक आहे. प्रमुख उत्पादनांसाठी मजबूत मागणी, क्षमता विस्तार, नवीन उत्पादनांमुळे कंपनी व्यवस्थापनास महसूल वाढीचा वेग कायम राहणे अपेक्षित आहे. विनती ऑरगॅनिक्सची पूर्ण मालकीची उपकंपनी वीरल ऑरगॅनिक्स आगामी काळात एमईएचक्यु, ग्वायाकॉल आणि आयएसओ एमिलीनचे उत्पादन सुरू करण्यासाठी सज्ज आहे. ज्यामुळे विनती ऑरगॅनिक्सला वाढीचा पुढील स्तर गाठण्यास मदत होणे अपेक्षित आहे. कंपनी जवळजवळ कर्ज मुक्त आहे. विनती ऑरगॅनिक्स लिमिटेडने सरासरी २३ टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न ऑन इन्व्हेस्टेड कॅपिटल मिळवून व्यवसायात उत्तम प्रगती केली आहे. मध्यम अवधीच्या आलेखानुसार विनती ऑरगॅनिक्स या कंपनीचा शेअर तेजीचा कल दर्शवत आहे. दीर्घावधीच्या दृष्टीनेदेखील या कंपनीच्या शेअरमध्ये टप्प्याटप्प्याने खरेदी करणे फायदेशीर ठरू शकेल.
सध्या निर्देशांक मर्यादित पातळ्यांमध्येच चढउतार करत असतानासुद्धा काही कंपन्यांचे शेअर आलेखानुसार तेजीचा कल दाखवत आहेत. बाजारात मध्यम अवधीसाठी तेजीचा व्यवहार करताना तेजीचा कल दर्शविणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत ओळखून व्यवहार करणे योग्य ठरू शकते, मात्र अशाप्रकारे मध्यम अवधीच्या आलेखानुसार तेजीचा कल दर्शविणारे शेअरदेखील अचानक पडझड दर्शवू शकतात. यामुळे जोखीम ओळखूनच व्यवहार करताना मर्यादित भांडवलावर मर्यादित धोका स्वीकारणे योग्य ठरते कारण गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते.
(या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
(लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत. )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.