रिझर्व्ह बॅंकेतील लेखाजोखा मांडणार रेड्डी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

या पुस्तकात मी रिझर्व्ह बॅंकेत काय केले एवढेच नसून, विचारसरणी, मूल्ये आणि पडद्यामागील तडजोडीही आहेत. माझ्या अर्धशतकाच्या सार्वजनिक जीवनात देशाला युद्ध, दुष्काळ, आणीबाणी, सुधारणा, वेगवान विकास यासारख्या मोठ्या घडामोडींना सामारे जावे लागल्याचे मी पाहिले आहे.
- वाय. व्ही. रेड्डी, माजी गव्हर्नर, रिझर्व्ह बॅंक

नवी दिल्ली : रिझर्व्ह बॅंकेमधील सुमारे पाच वर्षांच्या कार्यकाळातील लेखाजोखा माजी गव्हर्नर वाय. व्ही. रेड्डी पुस्तक रूपाने मांडणार आहेत. रेड्डी यांना तत्कालीन अर्थमंत्री मनमोहनसिंग, एन. टी. रामा राव आणि जसवंतसिंह यांच्यासोबत काम करताना आलेले अनुभव पुस्तकातून मांडले आहेत.

"ऍडव्हाइस ऍण्ड डिसेंट : माय लाइफ इन पॉलिसी मेकिंग' हे रेड्डी यांचे पुस्तक एप्रिलमध्ये प्रकाशित होत आहे. रेड्डी हे 2003 ते 2008 या कालावधीत रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर होते. जागतिक आर्थिक संकटाच्या या काळात रेड्डी हे उच्चांकी विकास दर, नीचांकी चलनवाढ आणि परकी गंगाजळीत वाढ झाल्याने स्थिरावलेला रुपया या गोष्टींचे साक्षीदार ठरले होते.

भांडवली खात्यांचे व्यवस्थापन करण्याच्या रेड्डी यांच्या हातोटीमुळे जागतिक आर्थिक संकटाच्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवरील संघटना त्यांची मत आणि सूचना जाणून घेत असत. यात संयुक्त राष्ट्रसंघ, आंतरराष्ट्रीय नाणे निधी यांसह अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांचा समावेश होता. रेड्डी यांनी त्यांच्या सार्वजनिक जीवनात मनमोहनसिंग, एन. टी. रामा राव, पी. चिदंबरम, जसवंतसिंह, सी. रंगराजन, बिमल जालान आणि अनेक बड्या व्यक्तींसोबत काम केले. रेड्डी हे 1964 च्या बॅचचे सनदी अधिकारी होते. त्यांना सरकारने 2010 मध्ये पद्मविभूषण देऊन सन्मानित केले.

Web Title: reddy to write on rbi