रिलायन्स बनली सर्वात मोठी कंपनी 

रिलायन्स बनली सर्वात मोठी कंपनी 

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असलेल्या इंडियन ऑइलला मागे टाकत रिलायन्स इंडस्ट्रीज आता सर्वाधिक महसूल कमावणारी देशातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. 2018-19 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीअखेर रिलायन्स इंडस्ट्रीजची एकूण उलाढाल 6.23 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. तर इंडियन ऑइलने 6.17 लाख कोटी रुपयांची उलाढाल नोंदवली आहे.

रिलायन्स ही देशातील सर्वाधिक निव्वळ नफा कमावणारी कंपनीसुद्धा ठरली आहे. 2018-19 या सरलेल्या आर्थिक वर्षात रिलायन्सने इंडियन ऑइलपेक्षा दुप्पट नफा कमावला आहे. साधारण एका दशकापूर्वी रिलायन्स आकाराने इंडियन ऑइलच्या निम्मीच होती. मात्र रिलायन्सने ग्राहकांची संख्या वाढवण्यावर, त्याचबरोबर नव्या व्यावसायिक संधी शोधण्यावर भर दिला. विशेषत: दूरसंचार, रिटेल आणि डिजिटल सेवांच्या व्यवसायात रिलायन्सने वेगाने विस्तार केला. रिलायन्सने 2018-19 या आर्थिक वर्षात एकूण 39,588 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. तर दुसऱ्या बाजूला इंडियन ऑइलने वर्षभरात एकूण 17.274 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.

मागील वर्षापर्यंत इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वाधिक नफा कमावणारी कंपनी होती. मात्र सरलेल्या आर्थिक वर्षात ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनने (ओएनजीसी) इंडियन ऑइलला मागे टाकत हा बहुमान पटकावला आहे. 

तिन्ही निकषांवर रिलायन्स "नंबर वन'

रिलायन्स महत्त्वाचा टप्पा गाठत महसूल, नफा आणि बाजारमूल्य या तिन्ही निकषांवर देशातील "नंबर वन' कंपनी ठरली आहे. रिलायन्सच्या महसुलात गेल्या आर्थिक वर्षात 44 टक्‍क्‍यांची भरघोस वाढ झाली.

2010 ते 2019 या दहा वर्षात रिलायन्सने चक्रवाढ पद्धतीने 14 टक्‍क्‍यांची वार्षिक वाढ नोंदवली आहे. रिलायन्सचे बाजारमूल्य 8.52 लाख कोटींवर पोचले असून, कंपनीकडे देशातील इतर कोणत्याही कंपनीपेक्षा जास्त म्हणजेच 1.33 लाख कोटी रुपयांची रोकड उपलब्ध आहे. मात्र याबरोबरच सर्वाधिक 2.87 लाख कोटी रुपयांचे कर्जदेखील रिलायन्सवर आहे. तर इंडियन ऑइलवर एकूण 92,700 कोटी रुपयांचे कर्ज आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com