अनिल अंबानींना 7,000 कोटींचे कंत्राट!

वृत्तसंस्था
Wednesday, 26 June 2019

कंपनीच्या शेअरच्या किंमती तब्बल 17.71 टक्क्यांची वाढ

कंपनीच्या शेअरच्या किंमती तब्बल 17.71 टक्क्यांची वाढ

मुंबई: अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फास्ट्रक्चरने वर्सोवा-बांद्रा सी लिंकचे तब्बल 7,000 कोटी रुपयांचे कंत्राट मिळवले आहे. महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून हे कंत्राट रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला देण्यात आले आहे. वर्सोवा-बांद्रा सी लिंक हा एक महत्त्वाचा प्रकल्प असून त्याची लांबी 17.17 किलोमीटर इतकी आहे. वर्सोवा-बांद्रा सी लिंकची लांबी प्रसिद्ध बांद्रा-वरळी सी लिंकच्या तिप्पट आहे. बांद्रा-वरळी सी लिंकची लांबी 5.6 किमी आहे. रिलायन् इन्फ्राला कंत्राट मिळाल्याच्या म्हणजे 24 जून 2019 पासून 60 महिन्यांच्या आत या प्रकल्पाचे काम पूर्ण करायचे आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांचा प्रवासाचा कालावधी दिड तासांवरून 10 मिनिटांवर येणार असल्याची माहिती रिलायन्स इन्फ्राने दिली आहे. मागील आठवड्यातच रेटिंग एजन्सीने रिलायन्स इन्फ्राचे मूल्यांकन कमी केले होते. रिलायन्स इन्फ्राला सध्या मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागत आहे.

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला 2018-19 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत 3,301 कोटी रुपयांचा जबरदस्त तोटा झाला आहे. हा कंपनीने आतापर्यत नोंदवलेला सर्वाधिक तोटा आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने आर्थिक निकाल जाहीर करण्यासंदर्भातील बैठक दोनदा पुढे ढकलली होती. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला झालेल्या तोट्यामुळे कंपनीच्या शेअरमध्येही घसरण बघायला मिळाली होती. अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहाने एकत्रितरित्या 2,426.82 कोटी रुपयांचा तोटा सरलेल्या आर्थिक वर्षात नोंदवला आहे. कंपनीच्या ऑडिटर्सनेसुद्धा कंपनीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे करत हा व्यवसाय सुरू ठेवण्याच्या कंपनीच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. कंपनीच्या सध्याच्या आर्थिक निकालांवर भाष्य करण्याइतपत ऑडीटशी संबंधित माहिती आपल्याकडे नसल्याचेही रिलायन्स इन्फ्राचे ऑडिटर्स बीएसआर अॅंड कंपनी आणि पाठक एचडी अॅंड असोसिएट्स यांनी म्हटले आहे. मागील आठवड्यात रिलायन्स कॅपिटलच्या ऑडिटर्स असलेल्या पीडब्ल्यूसीने रिलायन्सबरोबरचा करार रद्द केला होता. रिलायन्स कॅपिटलने ऑडिटर्सच्या कामाला 
आडकाठी केल्याचे सांगत ऑ़डिटर्स रिलायन्सबरोबरच्या करारामधून बाहेर पडले आहेत. याचा परिणाम म्हणून अनिल धीरूभाई अंबानी समूहाचीच कंपनी असलेल्या रिलायन्स इन्फ्राचे शेअरमध्ये मोठीच घसरण झालेली दिसून आली होती.

आज मात्र दिवसअखेर राष्ट्रीय शेअर बाजारात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअरच्या किंमती तब्बल 17.71 टक्क्यांची वाढ झालेली दिसून आली. दिवसअखेर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा 61.15 रुपये प्रति शेअर या पातळीवर होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reliance Infra bags Rs 7,000-cr Versova-Bandra Sea Link project