रिलायन्स 'त्या' ऐतिहासिक टप्प्यापासून फक्त '30 रुपये' दूर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 November 2019

मुकेश अंबानी सर्वेसर्वा असलेली रिलायन्स इंडस्ट्रीज एका ऐतिहासिक 'माईलस्टोन' पासून फक्त काही पावले दूर आहे. भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच 10 लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल असणारी पहिली कंपनी बनण्याचा बहुमान मिळवण्यापासून कंपनी आज वंचित राहिली, मात्र येत्या काही दिवसात तो टप्पा लवकरच पार केला जाण्याची शक्यता आहे.

मुंबई : मुकेश अंबानी सर्वेसर्वा असलेली रिलायन्स इंडस्ट्रीज एका ऐतिहासिक 'माईलस्टोन' पासून फक्त काही पावले दूर आहे. भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच 10 लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल असणारी पहिली कंपनी बनण्याचा बहुमान मिळवण्यापासून कंपनी आज वंचित राहिली, मात्र येत्या काही दिवसात तो टप्पा लवकरच पार केला जाण्याची शक्यता आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

रिलायन्सची उपकंपनी आणि दूरसंचार क्षेत्रात अल्पावधीत लोकप्रिय झालेली जिओ पुढील काही दिवसात मोबाईल सेवा शुल्कात वाढ करणार असल्याचे कंपनीने मंगळवारी जाहीर केले. त्याला गुंतवणूकदारांनी तुफान प्रतिसाद दिल्याने कंपनीचा शेअर आज 4 टक्क्यांपेक्षा जास्त वधारून राष्ट्रीय शेअर बाजारात 1,572.40 वर पोचला होता. यावेळी कंपनीचे बाजार भांडवल तब्बल   9.95 लाख कोटींच्या जवळपास पोचले होते. त्यामुळे आज जर कंपनीचा शेअर 1580 किंवा त्यापेक्षा जास्त पातळीवर पोचला असता तर कंपनीने 10 लाख कोटी रुपयांचा टप्पा सहज पार केला असता. यानंतर दिवसाच्या शेवटी शेअरमध्ये थोडी घसरण होऊन तो 1,548.50 वर स्थिरावला. त्यामुळे हा ऐतिहासिक टप्पा गाठण्यासाठी कंपनीला अंदाजे 1580 रुपये प्रति शेअरची पातळी गाठावी लागेल असे गृहीत धरल्यास कंपनी या 'माईलस्टोन'पासून फक्त '30 रुपये' दूर असल्याचे म्हणता येईल.

सत्तास्थापनेचा पेच कायम; स्वतंत्र महाराष्ट्र झाल्यानंतर पहिल्यांदाच अशी वेळ

देशातील तेल क्षेत्रातील सर्वात मोठी खासगी कंपनी असलेला रिलायन्स समूह ऊर्जा, पेट्रोकेमिकल्स, टेक्सटाइल, नैसर्गिक संसाधने, रिटेल आणि टेलिकम्युनिकेशन अशा विविध उद्योगात कार्यरत आहे. विशेष म्हणजे कंपनीने मागील महिन्याच्या 18 (ऑक्टोबर) तारखेलाच 9 लाख कोटी बाजार भांडवलाच टप्पा पार केला होता. त्यानंतर साधारणतः एकाच महिन्यात 1 लाख कोटींची वृद्धी झाली आहे. त्याचबरोबर जानेवारी महिन्यापासून कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल 34 टक्क्यांची वाढ झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reliance market cap inches closer to ₹10 lakh crore mark