esakal | सतरा एकरांमधील जिओ वर्ल्ड ड्राईव्ह; अवाढव्य मॉल ग्राहकांसाठी सज्ज होणार | Reliance
sakal

बोलून बातमी शोधा

Reliance jio world

सतरा एकरांमधील जिओ वर्ल्ड ड्राईव्ह; अवाढव्य मॉल ग्राहकांसाठी सज्ज होणार

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : बीकेसीच्या (BKC) आधुनिक वातावरणात तरुणाईला आणि सगळ्यांनाच जाणे हवेहवेसे वाटेल, अशा सतरा एकरांमधील अवाढव्य मॉल (Mall), जिओ वर्ल्ड ड्राईव्हची (Jio World drive) घोषणा रिलायन्सतर्फे (reliance) आज करण्यात आली आहे. फॅशन, कलेक्शन, खानपान, रुफटॉप ड्राईव्ह इन थिएटर, पाळीव प्राण्यांना सांभाळण्यासाठी वेगळी व्यवस्था असे सबकुछ येथे असेल.

हेही वाचा: मुंबई : आमदार निवासाच्या पुनर्विकासातील अडथळा दूर

एरव्ही कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या कार्यालयांच्या आणि रुक्ष कचेऱ्यांच्या गर्दीत हरवलेल्या बीकेसीमध्ये हा पहिलावहिला एवढा आलिशान मॉल येत आहे. 290 मोटारींना सामावून घेणारे मुंबईतील पहिलेच गच्चीवरील रुफटॉप ड्राईव्ह इन थिएटरही येथे पीव्हीआर तर्फे उभारले जाईल. साधारण याच ठिकाणी तीस वर्षांपूर्वी उभारलेल्या मुंबईतील पहिल्या जमिनीवरील ड्राईव्ह इन थिएटरच्या आठवणीही यामुळे ताज्या होतील. येथे पीव्हीआर तर्फे भारतात प्रथमच उभारल्या जाणाऱ्या संकुलात सहा मल्टिप्लेक्स थिएटर व प्रिव्ह्यू थिएटर असेल. येथे व्हिआयपी साठी वेगळे प्रवेशद्वारही असेल.

ग्राऊंड प्लस टू आणि गच्चीवर ड्राईव्ह इन थिएटर अशा स्वरुपात हा मॉल असेल. येथून पाय हलणार नाही अशा देशीविदेशी 72 विख्यात उत्पादनांचे ब्रँड्स, तोंडाला पाणी सुटेल अशा जगातील हव्या त्या वाफाळणाऱ्या रेसिपी समोर आणणारी 27 फूडकोर्ट, आठवड्याअखेरीस भरणारा खुला बाजार, पाळीव प्राण्यांना सांभाळण्याची व्यवस्था अशी अनेक आकर्षणे येथे असतील.

हेही वाचा: मुंबई : आर्यन खानसह तिघांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

येथे नजर खिळवून ठेवतील नामवंत कलाकारांनी साकारलेल्या एकाहून एक अशा देशी-विदेशी सरस कलात्मक बाबी आहेतच. पण तरुणाईला हव्याहव्याशा वाटणाऱ्या लाईफस्टाईल, फॅशनवेअर हे देखील येथे आहेच. बदललेल्या फॅशनचा सतत नवा ट्रेंड येथे येत राहील. जिओ वर्ल्ड ड्राईव्हमुळे बीकेसी हे उत्साही आणि सतत नव्याचा शोध घेणाऱ्यांचे आकर्षणकेंद्र राहील. जगातल्या कोणत्याही सर्वोत्तम बाजारपेठेतील अनुभव येथे मिळेल, जिओ ड्राईव्ह इन थिएरला भेट द्यावी ही सर्वच सिनेरसिकांची इच्छा राहील, असे रिलायन्स ब्रँड्स लि. चे सीईओ दर्शन मेहता यांनी सांगितले.

फ्रेशपिक हे रिलायन्सचे नवे रिटेल दुकान, गृहसजावटीचे वेस्ट इलम, याचबरोबर आपल्या आवडत्या प्राण्यांना सांभाळण्याची व्यवस्था, त्यांच्याबरोबर शॉपिंगची व्यवस्थाही येथे आहे. मंद संगीताचा आस्वाद घेत, जिभेवर वेगवेगळ्या चवींचे पदार्थ घोळवत येथे शांतपणे शॉपिंगही करता येईल. शॉपिंग करून दमल्यावर थोडा श्रमपरिहार करायचा असेल तर हातातल्या बॅगा सांभाळण्याची वेगळी व्यवस्थाही (हँड्स फ्री) केली जाईल. ग्राहकांना असे एकाचवेळी अनेक आगळेवेगळे अनुभव घ्यायची इच्छा असते. हीच इच्छा ओळखून रिलायन्स जिओ वर्ल्ड ड्राईव्ह ग्राहकांना आमंत्रित करीत आहे. ज्यांना दुसरी लस घेऊन चौदा दिवस झाले आहेत, अशांना कोविड नियमांचे पालन करून येथे प्रवेश मिळेल, असेही मेहता म्हणाले.

loading image
go to top