दोन हजारांची नोट छापण्यास येतो साडेतीन रुपयांचा खर्च 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 16 मार्च 2017

अजूनही पाचशे व दोन हजारांच्या नव्या नोटांची छपाई सुरू आहे. त्यामुळे या नव्या नोटांचा एकत्रित खर्च सांगणे तूर्तास शक्‍य नाही.

नवी दिल्ली : रिझर्व्ह बॅंकेला पाचशे व दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा छापण्यासाठी नेमका किती खर्च होत आहे, याची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे. रिझर्व्ह बॅंकेला प्रत्येक पाचशे रुपयाच्या नोटेमागे 2.87 ते 3.09 रुपयांचा खर्च येत आहे.

दोन हजारांच्या नोटेसाठी सुमारे 3.54 ते 3.77 रुपयांचा खर्च येत आहे, अशी माहिती अर्थ राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी राज्यसभेत लेखी स्वरूपात दिली आहे. 

''अजूनही पाचशे व दोन हजारांच्या नव्या नोटांची छपाई सुरू आहे. त्यामुळे या नव्या नोटांचा एकत्रित खर्च सांगणे तूर्तास शक्‍य नाही. सर्वसामान्यांची अडचण दूर करण्यासाठी सतत नव्या नोटा छापल्या जात आहेत,'' असे मेघवाल यांनी म्हटले आहे. 

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर बॅंकांमध्ये जुन्या नोटांच्या स्वरुपात 12.44 लाख कोटी रुपयांची रक्कम जमा झाली. या नोटांची पडताळणी अद्याप सुरू असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले.

Web Title: Rs 2000 notes Reserve Bank of India Parliament Arjunram Meghwal Rajya Sabha