सार्वजनिक बॅंकांना संजीवनी

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जुलै 2018

नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांना सरकारकडून भांडवली स्वरूपात ११ हजार ३३६ कोटींची मदत करण्यास अर्थ खात्याने मंगळवारी (ता.१७) हिरवा कंदील दाखवला आहे. या निर्णयामुळे आर्थिक गैरव्यवहार आणि बुडीत कर्जांनी संकटात सापडलेल्या पंजाब नॅशनल बॅंक, कॉर्पोरेशन बॅंक आणि आंध्र बॅंक यांना दिलासा मिळाला असून, त्यांना भांडवलपूर्ततेसाठी संजीवनी मिळाली आहे. 

चालू आर्थिक वर्षात भांडवली मदतीच्या पहिल्या टप्प्यात  ११ हजार ३३६ कोटी बॅंकांना दिले जाणार आहेत. उर्वरित ५३ हजार ६६४ कोटी मार्चअखेरपर्यंत बॅंकांना देण्यात येतील. नीरव मोदीच्या गैरव्यवहारामुळे बेजार झालेल्या पंजाब नॅशनल बॅंकेला (पीएनबी) सर्वाधिक २ हजार ८१६ कोटींची मदत मिळणार आहे. त्याखालोखाल कॉर्पोरेशन बॅंकेला २ हजार ५५५ कोटी, इंडियन ओव्हरसीज बॅंक २ हजार १५७ कोटी, आंध्र बॅंक २ हजार १९ कोटी, अलाहाबाद बॅंकेला १ हजार ७९० कोटी सरकारकडून भांडवलीस्वरूपात दिले जातील. भांडवली मदतीच्या प्रस्तावाला आज अर्थ खात्याकडून मंजुरी देण्यात आली. लाभांशाची देणी, बुडीत कर्जे आणि तोट्यामुळे अनेक बॅंकांची आर्थिक स्थिती कमकुवत झाली आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने सार्वजनिक बॅंकांमध्ये २.११ लाख कोटींचा भांडवल भरणा करण्याचे जाहीर केले होते. यातील १.३५ लाख कोटी बाँड्‌समधून मिळणार आहेत, तर उर्वरित ५८ हजार कोटी भांडवली बाजारातून उभारण्यात येतील.

Web Title: Sanjivani to public banks