"बीएसई'चे "इन्फोसिस'ला खुलासा देण्याचे निर्देश 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

आर्थिक नियमिततेबाबत कर्मचाऱ्यांनी केलेल्या लेखी तक्रारीची माहिती दडवल्याबद्दल मुंबई शेअर बाजाराने (बीएसई) "इन्फोसिस'ला खुलासा देण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई : आर्थिक नियमिततेबाबत कर्मचाऱ्यांनी केलेल्या लेखी तक्रारीची माहिती दडवल्याबद्दल मुंबई शेअर बाजाराने (बीएसई) "इन्फोसिस'ला खुलासा देण्याचे निर्देश दिले आहेत. या तक्रारीच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (ता.22) शेअर बाजारात "इन्फोसिस'च्या शेअरमध्ये 16 टक्‍क्‍यांची घसरण झाली होती, यातून गुंतवणूकदारांना 53 हजार कोटींचा फटका बसला. 

या प्रकरणी "इन्फोसिस'चे अध्यक्ष नंदन निलेकणी यांनी मंगळवारी निवेदन जारी केले होते. ज्यात कंपनी व्यवस्थापनाला 20 सप्टेंबर रोजी आर्थिक अनियमिततेबाबत लेखी तक्रार प्राप्त झाली होती. ही तक्रार 10 ऑक्‍टोबर रोजी लेखापरिक्षण समितीसमोर ठेवण्यात आल्याचे निलेकणी यांनी शेअर बाजाराला कळवले आहे. याशिवाय एक आणखी लेखी तक्रार ज्यात तारीख नमूद नव्हती, ती देखील समितीपुढे ठेवण्यात आल्याचे निलेकणी यांनी म्हटले आहे. या तक्रारी इन्फोसिसचे कायदेशीर सल्लागार शार्दुल अमरचंद मंगलदास अँड कंपनी यांच्याकडे तपासासाठी पाठवण्यात आली आहे. काही प्रामाणिक कर्मचाऱ्यांनी संचालक मंडळाला लिहिलेल्या तक्रारीत मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारिख आणि मुख्य वित्तीय अधिकारी निलांजन रॉय यांनी बड्या कंत्राटांमधून आर्थिक लाभ मिळवला असल्याचा आरोप केला आहे. संचालक मंडळाला हे पत्र 20 सप्टेंबर रोजी प्राप्त झाले होते. 

दरम्यान, निलेकणी यांनी मंगळवारी बाजाराला पत्राद्वारे माहिती दिली, मात्र कर्मचाऱ्यांची लेखी तक्रार प्राप्त झाल्यानंतर तातडीने शेअर बाजाराला का कळवले नाही, याबाबत "बीएसई'ने इन्फोसिसला खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत. कंपनीने तक्रारीची माहिती "सेबी'च्या "कलम 30' अनुसार शेअर बाजाराला दिली नाही, याबद्दल "बीएसई'ने नाराजी व्यक्त केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SEBBSE ask Infosys why it didn't disclose whistleblower complaints