Sensex : सेन्सेक्सचा नवीन उच्चांक; सव्वादोन लाख कोटींनी गुंतवणुकदार श्रीमंत

अमेरिकी फेडरल बँकेने व्याजदरवाढीचा वेग कमी करण्याचे सूतोवाच केल्याने उत्साही गुंतवणुकदारांनी आयटी शेअरची जोरदार खरेदी करून सेन्सेक्स नव्या उच्चांकावर नेला.
sensex up
sensex upsakal
Updated on
Summary

अमेरिकी फेडरल बँकेने व्याजदरवाढीचा वेग कमी करण्याचे सूतोवाच केल्याने उत्साही गुंतवणुकदारांनी आयटी शेअरची जोरदार खरेदी करून सेन्सेक्स नव्या उच्चांकावर नेला.

मुंबई - अमेरिकी फेडरल बँकेने व्याजदरवाढीचा वेग कमी करण्याचे सूतोवाच केल्याने उत्साही गुंतवणुकदारांनी आयटी शेअरची जोरदार खरेदी करून सेन्सेक्स नव्या उच्चांकावर नेला, तर निफ्टीही सर्वकालिक उच्चांकाच्या जवळ आणून ठेवला. आज सव्वा टक्का वाढलेल्या सेन्सेक्सने व्यवहारादरम्यान ६२,४१२.३३ असा सर्वकालिक उच्चांक गाठला.

भारतात आयटी शेअरच्या खरेदीमुळे निर्देशांक वाढले. व्याजदरवाढीचा वेग पुढील बैठकीत कमी केला जाईल, याचे सूतोवाच आज अमेरिकी फेडरल बँकेने केल्याने जागतिक शेअरबाजारही तेजीत होते. त्यामुळे आज सेन्सेक्स व निफ्टी सकाळपासूनच नफ्यात होते. त्यात शेवटच्या तासात जोरदार खरेदी झाल्याने निर्देशांक वाढले. ७६२.१० अंशांनी वाढलेला सेन्सेक्स ६२,२७२.६८ अंशांवर स्थिरावला. तर २१६.८५ अंशांनी वाढलेला निफ्टी १८,४८४.१० अंशांवर बंद झाला.

सेन्सेक्सने व्यवहारादरम्यान सर्वकालिक उच्चांक गाठला असला तरीही त्याने बंद पातळीवर अजून सर्वकालिक उच्चांक केला नाही. निफ्टी मात्र अजूनही सर्वकालिक उच्चांकापासून ७४ अंश लांब आहे. बीएसईवरील सर्व गुंतवणुकदारांच्या एकूण मालमत्तेचे मूल्य सव्वादोन लाखकोटी रुपयांनी वाढले. काल बीएसई वरील सर्व शेअरचे एकूण बाजारमूल्य २८१.४४ लाखकोटी रुपये होते. ते आज २८३.७० लाखकोटी रुपये झाले.

अमेरिकी आयटी शेअरचा प्रमुख निर्देशांक नॅसडॅक देखील वाढल्याने भारतातील आयटी शेअरमध्येही जोरदार खरेदी झाली. सार्वजनिक बँका तसेच खासगी बँका आणि वित्तसंस्थांचे शेअरही आज वाढले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव घसरणेही शेअरबाजार वाढीला अनुकूल ठरले. तर भारतीय शेअरबाजारांचा व्हॉल्टॅलिटी इंडेक्सही घसरत असल्याने ते देखील उत्साहवर्धक असल्याचे जाणकारांनी दाखवून दिले.

निफ्टीमधील प्रमुख ५० शेअरपैकी ४४ शेअरचे भाव वाढले तर सेन्सेक्सच्या मुख्य ३० पैकी २६ शेअरचे भाव वाढले. इन्फोसिस, एचसीएल टेक, विप्रो, टेक महिंद्र व टीसीएस या शेअरचे भाव दोन ते तीन टक्के वाढले. तर एचडीएफसी, हिंदुस्थान युनिलीव्हर, एचडीएफसी बँक, सनफार्मा, महिंद्र आणि महिंद्र, लार्सन अँड टुब्रो, आयसीआयसीआय बँक, नेस्ले व रिलायन्स इंडस्ट्रीज या शेअरचे भाव एक ते दोन टक्के वाढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com