सेन्सेक्‍स, निफ्टीची ऐतिहासिक कामगिरी 

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 एप्रिल 2017

रुपया 21 महिन्यांच्या उच्चांकावर 
चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया वधारला. बॅंकांनी डॉलरची विक्री केल्याने डॉलरचे मूल्य घसरले. रुपया 64.11 वर बंद झाला. गेल्या 21 महिन्यांतील रुपयाची ही सर्वोच्च पातळी आहे. 

मुंबई - गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने तेजीच्या लाटेवर स्वार झालेल्या सेन्सेक्‍सने 30 हजार अंशांचा टप्पा ओलांडला. दिवसअखेर 190 अंशांच्या वाढीसह सेन्सेक्‍स प्रथमच 30 हजार 133.35 अंशांवर स्थिरावला. निफ्टीही 42 अंशांच्या वाढीसह 9,351.85 अंशांच्या ऐतिहासिक पातळीवर बंद झाला. 2015 नंतर सेन्सेक्‍सने पुन्हा एकदा 30 हजारांना गवसणी घातल्याने शेअर बाजारातील दलालांनी जल्लोष केला. गेल्या दोन वर्षांत 800 समभागांनी दुप्पट परतावा देऊन गुंतवणूकदारांना मालामाल केले. 

जागतिक तसेच देशांतर्गत घडामोडींनी बाजारात खरेदीसाठी पूरक वातावरण निर्माण झाले आहे. परदेशी गुंतवणूकदारांबरोबरच स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारदेखील खरेदीमध्ये आघाडीवर आहेत. मंगळवारी (ता. 25) परदेशी गुंतवणूकदारांनी 178 कोटी आणि स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी तब्बल 998.26 कोटींचे समभाग खरेदी केले. यामुळे गेल्या तीन सत्रांत सेन्सेक्‍समध्ये 768 अंशांची वाढ नोंदवण्यात आली. 
फ्रान्समधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात मध्यममार्गी इमान्युएल मेक्रॉन यांनी विजय मिळवल्यानंतर जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये उत्साह संचारला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कर सुधारणांवरही गुंतवणूकदार लक्ष ठेवून असल्याचे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

जागतिक घडामोडींमुळे सेन्सेक्‍समधील 30 पैकी 18 शेअर्स तेजीसह बंद झाले. यात आयटीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, एचडीएफसी, एचयूएल, आयसीआयसीआय बॅंक, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, मारुती आदी शेअर्स वधारले. आशिया आणि युरोपातील बहुतेक बाजार तेजीत होते. 

800 समभागांचा दुप्पट परतावा 
सेन्सेक्‍सने यापूर्वी 4 मार्च 2015 रोजी 30,024.74 या उच्चांकावर पोचला होता. दोन वर्षांच्या काळात बाजारातील तब्बल 800 समभागांनी गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा दिला. यातील 20 समभागांची वाढ एक हजारांहून अधिक टक्‍क्‍यांनी झाली. ज्यात मेडिकॅमेन बायोटेक जो समभाग 2015 मध्ये 12 रुपयांवर होता, तो आज 497 रुपयांपर्यंत वाढला. 

शेवटच्या सत्रात नफा वसुली दिसून आली; मात्र खरेदीच्या ओघापुढे ती फारकाळ टिकली नाही. 
- विनोद नायर, जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेस 

रुपया 21 महिन्यांच्या उच्चांकावर 
चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया वधारला. बॅंकांनी डॉलरची विक्री केल्याने डॉलरचे मूल्य घसरले. रुपया 64.11 वर बंद झाला. गेल्या 21 महिन्यांतील रुपयाची ही सर्वोच्च पातळी आहे. 

Web Title: Sensex closes above 30000 for first time ever