सेन्सेक्‍स 306 अंशांनी कोलमडला

पीटीआय
गुरुवार, 24 मे 2018

मुंबई - देशातील इंधन दरवाढीचा बोजा काही प्रमाणात सरकारी तेल कंपन्यांवर टाकला जाण्याच्या शक्‍यतेने शेअर बाजाराला बुधवारी फटका बसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ३०६ अंशांनी गडगडून ३४ हजार ३४४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत १०६ अंशांची घसरण होऊन १० हजार ४३० अंशांवर बंद झाला. 

मुंबई - देशातील इंधन दरवाढीचा बोजा काही प्रमाणात सरकारी तेल कंपन्यांवर टाकला जाण्याच्या शक्‍यतेने शेअर बाजाराला बुधवारी फटका बसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ३०६ अंशांनी गडगडून ३४ हजार ३४४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत १०६ अंशांची घसरण होऊन १० हजार ४३० अंशांवर बंद झाला. 

देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. महागाईचा भडका उडाला असून, जनतेत असंतोषाचे वातावरण आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारी तेल कंपन्यांनी दरवाढीतील काही बोजा उचलावा, अशी मागणी सरकार करण्याची शक्‍यता आहे. यामुळे एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी, ओएनजीसी आणि ओआयएल या सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांच्या समभागात मोठी घसरण झाली. सेन्सेक्‍स आज सकाळी सुरवातीला वधारला. नंतर त्यात घसरण होण्यास सुरवात झाली. अखेर कालच्या तुलनेत ३०६ अंशांनी गडगडून तो ३४ हजार ३४४ अंशांवर बंद झाला. ही निर्देशांकाची १९ एप्रिलनंतरची नीचांकी पातळी आहे. त्या वेळी निर्देशांक ३४ हजार ४२७ अंशांवर बंद झाला होता. 

दरम्यान, काल (ता. २२) परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १ हजार ६५१ कोटी रुपयांचे समभाग विकले; तर परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १ हजार ४९६ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले. जागतिक पातळीवर आज घसरणीचे चित्र होते. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार चर्चेबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिकूल मत व्यक्त केल्याचे ही घसरण झाली.  

टाटा स्टीलला फटका 
टाटा स्टीलच्या समभागात आज सर्वाधिक ६.५७ टक्के घसरण झाली. त्याखालोखाल ओएनजीसीच्या समभागात ४.७५ टक्के घसरण झाली. स्टेट बॅंक ऑफ इंडियाला तिमाहीत सर्वाधिक तोटा होऊनही बॅंकेच्या समभागात आज ३.५६ टक्के वाढ झाली. 

कंपन्यांचे अपेक्षेपेक्षा कमी लागलेले निकाल आणि अमेरिका-चीन व्यापार चर्चेबाबतची साशंकता यामुळे शेअर बाजारात घसरण झाली. धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात मोठी घसरण झाली, मात्र बॅंकांच्या समभागात वाढ झाल्याने घसरण काही प्रमाणात रोखली गेली. 
- विनोद नायर, संशोधन प्रमुख, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस

सेन्सेक्‍सचा नीचांक

19 एप्रिल :  34,427
23 मे :  34,344

Web Title: Sensex down by 306 points