शेअर बाजारात "ब्लॅक फ्रायडे'

पीटीआय
Saturday, 29 February 2020

शेअर बाजारात सलग सहाव्या सत्रात शुक्रवारी घसरण झाली असून, आजचा दिवस बाजारासाठी ‘ब्लॅक फ्रायडे’ ठरला.

मुंबई - शेअर बाजारात सलग सहाव्या सत्रात शुक्रवारी घसरण झाली असून, आजचा दिवस बाजारासाठी ‘ब्लॅक फ्रायडे’ ठरला. कोरोना विषाणूंमुळे जगभर मंदीचे वारे पसरत असल्याने गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १ हजार ४४८ अंशांनी कोसळून ३८ हजार २९७ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ४३१ अंशांनी गडगडून ११ हजार २०१ अंशांवर स्थिरावला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सकाळच्या सत्रात बाजार सुरू होताच काही मिनिटांमध्ये सेन्सेक्‍स एक हजार अंशांनी कोसळला. त्यानंतर निर्देशांकातील घसरण सुरूच राहिली. गुंतवणूकदारांनी दिवसभर विक्रीचा मारा सुरू ठेवला. क्षेत्रीय पातळीवर बॅंकिंग, वाहननिर्मिती, औषधनिर्माण, धातू, एफएमसीजी, ऊर्जा आणि तेल व नैसर्गिक वायू कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली. शेअर बाजारात आज झालेल्या पडझडीत गुंतवणूकदारांनी सुमारे सहा लाख कोटी रुपये गमावले आहेत. शेअर बाजारात सलग सहा सत्रांत झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना एकूण दहा लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. 

समभाग नीचांकी पातळीवर 
निफ्टीच्या मंचावर दोनशेहून अधिक कंपन्यांचे समभाग वर्षभरातील नीचांकी पातळीवर पोचले. गेल, बॉश, लुपिन, विप्रो, हिरो मोटोकॉर्प, आयटीसी, ओएनजीसी, हिंदाल्को, एसीसी, एल अँड टी यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाली. कोरोना विषाणूंमुळे विमान कंपन्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने इंडिगो आणि स्पाइसजेट या प्रवासी विमान कंपन्यांच्या समभागात मोठी घसरण झाली. 

जगभरातील शेअर बाजार कोसळले
जागतिक पातळीवर कोरोना विषाणूंचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूने जगभरातील पन्नासहून अधिक देशांमध्ये पाय पसरले आहेत. याचबरोबर चीनला बसलेल्या फटक्‍यामुळे जागतिक पातळीवर पुरवठा साखळीला मोठा धक्का बसला आहे. यामुळे जगभरातील प्रमुख शेअर बाजार कोसळले. काल (ता. २८) अमेरिकी शेअर बाजारात जोरदार पडझड झाली. डाऊ जोन्स निर्देशांकामध्ये १ हजार १९० अंश, एस अँड पी ५०० निर्देशांकात १३७ अंश आणि नॅसडॅकमध्ये ४१४ अंशांची घसरण झाली. 

निर्देशांकातील घसरण 
सेन्सेक्‍स - १,४४८ अंश 
निफ्टी - ४३१ अंश

रुपया गडगडला 
देशांतर्गत शेअर बाजारातील घसरण आणि परकी गुंतवणूकदारांकडून निधी काढून घेण्यात येत असल्याने शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ६० पैशांनी गडगडला. आज रुपया ७२.२१ या मागील सहा महिन्यांतील नीचांकी पातळीवर बंद झाला. ‘कोरोना’ विषाणूच्या संसर्गाचा जागतिक अर्थव्यवस्थेसमोरील चिंता वाढली आहे. यामुळे शेअर बाजारात आज पडझड झाली. परकी गुंतवणूकदारांकडून निधी काढून घेण्याचे प्रमाणही वाढले आहे.

विकासदरातील घसरण सुरूच 
नवी दिल्ली -
 देशाचा विकासदर म्हणजेच एकूण देशांतर्गत उत्पन्न (जीडीपी) चालू आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत ४.७ टक्‍क्‍यांवर आले आहे. मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीत विकासदर ५.६ टक्के होता. राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने यासंदर्भातील आकडेवोरी शुक्रवारी जाहीर केली. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत विकासदर ५.१ टक्‍क्‍यांवर आला आहे.

मागील आर्थिक वर्षी याच कालावधीत विकासदर ६.३ टक्के नोंदवण्यात आला होता. चालू आर्थिक वर्षासाठी देशाचा विकासदर ५ टक्के राहण्याचा अंदाज राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने व्यक्त केला आहे. रिझर्व्ह बॅंकेनेही चालू आर्थिक वर्षासाठी विकासदर ५ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. ऑक्‍टोबर ते डिसेंबर २०१९ या कालावधीत चीनच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर ६ टक्के होता. मागील २७ वर्षांमधील हा नीचांकी विकासदर होता. चीनचा विकासदर २०१९ या वर्षात ६.१ टक्के नोंदवण्यात आला. हा मागील तीन दशकांमधील चीनचा सर्वात कमी विकासदर आहे.

वित्तीय तूट उद्दिष्टाच्या १२८.५ टक्‍क्‍यांवर
देशाची वित्तीय तूट जानेवारीअखेर अर्थसंकल्पी उद्दिष्टाच्या १२८.५ टक्‍क्‍यांवर पोचली आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत देशाची वित्तीय तूट अर्थसंकल्पी उद्दिष्टाच्या १२१.५ टक्के होती. एकूण खर्च आणि महसूल यामधील फरक किंवा वित्तीय तूट ९ लाख ८५ हजार ४७२ कोटी रुपयांवर पोचली आहे. चालू आर्थिक वर्षासाठी वित्तीय तूट ७ लाख ६६ हजार ८४६ कोटी रुपयांवर राखण्याचे उद्दिष्ट आखले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex falls 1448 points Black Friday for markets