शेअर बाजारात परतली तेजी

पीटीआय
Wednesday, 4 March 2020

शेअर बाजारात सलग सात सत्रांत सुरू असलेली घसरण अखेर मंगळवारी थांबली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ४७९ अंशांची उसळी घेऊन ३८ हजार ६२३ अंशांवर बंद झाला.

मुंबई - शेअर बाजारात सलग सात सत्रांत सुरू असलेली घसरण अखेर मंगळवारी थांबली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ४७९ अंशांची उसळी घेऊन ३८ हजार ६२३ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १७० अंशांनी वाढून ११ हजार ३०३ अंशांवर स्थिरावला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गुंतवणूकदारांमध्ये विश्‍वास निर्माण करण्यासाठी आणि वित्तीय बाजारांच्या सुरळीत कामकाजासाठी आवश्‍यक पावले उचलण्यास तयार असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने स्पष्ट केल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये उत्साह संचारला. याचबरोबर आशियातील शेअर बाजारांमधील सकारात्मक वातावरण आणि कोरोना विषाणूच्या संसर्गावर लवकरच औषध उपलब्ध होईल, असे अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी जाहीर केल्याने गुंतवणूकदारांनी खरेदीवर जोर दिला.

सोशल मिडीयावरील गैरसमजामुळे अंड्यांच्या मागणीत 40 टक्‍क्‍यांनी घट

गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीमुळे स्मॉलकॅप, मिडकॅप, लार्जकॅप निर्देशांकांबरोबरच क्षेत्रनिहाय निर्देशांकही तेजीसह व्यवहार करून बंद झाले. क्षेत्रनिहाय निर्देशांकांपैकी धातू आणि ऊर्जा निर्देशांक सर्वाधिक अनुक्रमे ५.६७ आणि ३.९९ टक्‍क्‍यांनी वधारून बंद झाले. सेन्सेक्‍सच्या मंचावर आज आयटीसी आणि एचडीएफसी बॅंकेचा अपवाद वगळता इतर सर्व २८ समभाग सकारात्मक व्यवहार करून बंद झाले. सनफार्मा, टाटा स्टील, एनटीपीसी, ओएनजीसी, पॉवरग्रीड, अल्ट्राटेक सिमेंट आणि हिरो मोटोकॉर्पचे समभाग तब्बल चार ते सात टक्‍क्‍यांपर्यंत वधारले.

आशियातील शेअर बाजारांमध्ये हाँगकाँग, जपानचे निर्देशांक वधारले. तसेच, कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर आज उशिरा ‘जी ७’ देशांच्या प्रमुखांची व्हिडिओ कान्फरन्सिंगद्वारे चर्चा होणार असल्याने जागतिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याच्या अपेक्षेने खनिज तेलाचे भावही वधारले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex gains 480 points