सेन्सेक्‍सची पुन्हा आपटी; निर्देशांक सात महिन्यांतील नीचांकी पातळीवर

सेन्सेक्‍सची पुन्हा आपटी; निर्देशांक सात महिन्यांतील नीचांकी पातळीवर

मुंबई : शेअर बाजारातील घसरगुंडी शुक्रवारी कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स आज 340 अंशांची आपटी खाऊन 33 हजार 349 या सात महिन्यांतील नीचांकी पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही 94 अंशांची घसरण होऊन 10 हजार 30 अंशांवर बंद झाला. 

घसरणीचा दुसरा आठवडा 
रुपयातील घसरण आणि जागतिक शेअर बाजारांतील घसरणीमुळे नोव्हेंबरमधील वायदे व्यवहारांची सुरवात नकारात्मक झाली आहे. हा सेन्सेक्‍स आणि निफ्टीमधील घसरणीचा सलग दुसरा आठवडा आहे.

सेन्सेक्‍समध्ये या आठवड्यात 966 अंश म्हणजेच 3 टक्के घसरण झाली आहे. निफ्टीमध्ये या आठवड्यात 273 अंश म्हणजेच 2.7 टक्के घसरण झाली आहे. रुपयात सातत्याने घसरण सुरू असून, आज दिवसभरात तो डॉलरच्या तुलनेत 73.45 या पातळीपर्यंत घसरला होता. याचबरोबर चलन टंचाईचे सावट असल्याने शेअर बाजारात घसरणीचे वारे निर्माण झाले. आशियातील बहुतांश शेअर बाजार आज गडगडले. युरोपीय शेअर बाजारांमध्ये आज घसरणीचे वातावरण होते. 

निराशाजनक निकालांचा फटका 
कंपन्यांचे निराशाजनक निकाल आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबतची चिंता याचा फटका शेअर बाजाराला बसला. मारुती सुझुकी, येस बॅंक यांच्यासह काही कंपन्यांचे निकाल अपेक्षेप्रमाणे न लागल्याने बाजारात विक्रीचा जोर वाढला, अशी माहिती शेअर दलालांनी दिली. सेन्सेक्‍स आज 33 हजार 776 अंश ते 33 हजार 298 अंश या दरम्यान चढउतार झाले. अखेर तो 340 अंश म्हणजेच 1.01 टक्‍क्‍यांची घसरण होऊन 33 हजार 349 अंशावर बंद झाला. ही सेन्सेक्‍सची 5 एप्रिलनंतरची नीचांकी पातळी आहे. त्या वेळी निर्देशांक 33 हजार 596 अंशांवर बंद झाला होता. दरम्यान, काल (ता.25) परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1 हजार 495 कोटी रुपयांचे समभाग विकले, तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 339 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले. 

सेन्सेक्‍सची नीचांकी पातळी 

  • 5 एप्रिल : 33,596 अंश 
  • 26 ऑक्‍टोबर : 33,349 अंश 

आठवड्यातील घसरण 

  • सेन्सेक्‍स - 966 अंश 
  • निफ्टी - 273 अंश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com