सेन्सेक्‍स, निफ्टीच्या घोडदौडीला लगाम 

पीटीआय
Monday, 23 December 2019

शेअर बाजारात सलग चार सत्रांत सुरू असलेले तेजीचे वारे अखेर सोमवारी संपुष्टात आले. यामुळे सेन्सेक्‍स आणि निफ्टीची घोडदौड रोखली गेली आहे. 

मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 38 अंशांची घसरण होऊन 41 हजार 642 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी किरकोळ 9 अंशांची घट होऊन 12 हजार 262 अंशांवर स्थिरावला.

पदार्पणातच नेस्लेला फटका 
सेन्सेक्‍सच्या मंचावर आज टायटन कंपनी, अल्ट्राटेक सिमेंट आणि नेस्ले इंडिया यांनी पदार्पण केले आणि येस बॅंक, वेदांता, टाटा मोटर्स आणि टाटा मोटर्स डीव्हीआर या कंपन्या बाहेर पडल्या. आज झालेल्या पदार्पणातच नेस्ले इंडिया कंपनीच्या समभागात सर्वाधिक 2.20 टक्‍क्‍यांची घसरण झाली. त्याखालोखाल एसबीआय, टेक महिंद्रा, आयटीसी आणि महिंद्रा यांच्या समभागात घसरण नोंदविण्यात आली. मारुती, हिरो मोटोकॉर्प, कोटक बॅंक, बजाज ऑटो आणि बजाज फायनान्स यांच्या समभागात आज झालेल्या वाढीमुळे सेन्सेक्‍समधील घसरण काही प्रमाणात रोखली गेली. 

रिलायन्सच्या समभागात मोठी घसरण  
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या हिस्साविक्री योजनेला सरकारकडून झालेल्या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर शेअर बाजारात घसरणीचे वातावरण निर्माण झाले. रिलायन्सच्या समभागात नफेखोरी करण्यावर गुंतवणूकदारांनी भर दिला. यामुळे कंपनीच्या समभागात 1.78 टक्‍क्‍यांची घसरण झाली. रिलायन्स कंपनी खनिज तेल आणि रसायन व्यवसायातील 20 टक्के हिस्सा सौदी अरॅमको कंपनीला 15 अब्ज डॉलरला विकणार आहे. कंपनीने पन्ना-मुक्ता आणि ताप्ती तेल व नैसर्गिक वायू क्षेत्रांचे 3.5 अब्ज डॉलरचे सरकारी शुल्क भरले नसल्याने सरकारने या हिस्साविक्रीस प्रतिबंध करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sensex, nifty snaps record run