शेअर बाजारात एका तासात पाच लाख कोटींची कमाई

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

काही मिनिटांमध्ये कंपन्यांचे बाजार भांडवल वधारले. ते 138.54 लाख कोटींवरून 143.45 लाख कोटींवर पोचले आहे.

मुंबई: भारतीय उद्योगांना कॉर्पोरेट करातून आणि परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांना (एफपीआय) अधिभारातून दिलेल्या सवलतींचा मोठा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसून आला. परिणामी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत या घोषणा जाहीर करताच पुढच्या काही मिनिटांमध्ये कंपन्यांचे बाजार भांडवल वधारले. ते 138.54 लाख कोटींवरून 143.45 लाख कोटींवर पोचले आहे. शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी अनुक्रमे 2000 आणि 550 अंशांनी वधारले आहेत. तेजी ऐतिहासिक असून गेल्या दहा वर्षात एका दिवसात झालेली सर्वाधिक तेजी भारतीय शेअर बाजारात झाली आहे. 

बँक निफ्टी 2,163.80 अंशांनी वधारला
 बँक निफ्टी सर्वाधिक वधारला असून त्यात 2,163.80 अंशांची वाढ झाली आहे. बँक निफ्टी 28 हजार 921.45 अंशावर व्यवहार करतो आहे. बँकिंग आणि वित्तीय कंपन्यांमध्ये इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, एसबीआय, येस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये 10 टक्क्यांपर्यंतची तेजी आहे. 

ऑटो सेक्टर
गेल्या काही दिवसांपासून सर्वाधिक अडचणीत असलेल्या वाहन उद्योग क्षेत्रात देखील मोठी तेजी आली आहे. मारुती सुझुकीचा शेअर 14.63 टक्क्यांनी वधारला असून तो 6807 रुपयांवर व्यवहार करतो आहे. त्यापाठोपाठ टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा,  बॉश, बजाज ऑटो ,आयशर मोटर्स आणि अशोक लेलँडसारख्या कंपन्यांचे शेअर १० टक्क्यांनी वधारले आहेत. 

एफएमसीजी
'फास्ट-मूविंग कन्झ्युमर गुड्स (एफएमसीजी) क्षेत्रातील एचयूएल, आयटीसी, ब्रिटानिया, गोदरेज, मॅरिको या कंपन्या देखील मोठ्या प्रमाणात तेजीत व्यवहार करत आहे.

रुपया वधारला
 डॉलरच्या तुलनेत रुपया 66 पैशांनी वधारून 70.68 वर व्यवहार करत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex, Nifty surge most in 10 years sees highest single-day gain