शेअर बाजारासाठी स्थिर सरकार सकारात्मक

 शेअर बाजारासाठी स्थिर सरकार सकारात्मक

एल अँड टी म्युच्युअल फंडाचे सीईओ आणि 'अॅम्फी'चे उपाध्यक्ष कैलाश कुलकर्णी यांच्याशी ‘सकाळ मनी’ने साधलेल्या संवादाचा हा सारांश. 

प्रश्‍न ः केंद्रात स्थिर आणि प्रचंड बहुमताचे मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले आहे; शेअर बाजार कुठपर्यंत जाईल, असे वाटते? 

शेअर बाजार कुठे जाईल, हा सध्या सर्वांकडून विचारला जाणारा प्रश्न आहे. पण, माझ्या मते बाजार हा कोणत्याही तात्पुरत्या घटनांमुळे वाढत नसतो. बाजारातील कंपन्यांचा नफा आणि त्यांच्या कामगिरीचा शेअर बाजारावर परिणाम होत असतो. त्यामुळे निवडणुका किंवा नवे सरकार सत्तेत येण्याच्या परिणामामुळे अल्पकालीन चढ-उतार होऊ शकतात. मात्र, स्थिर सरकार बाजाराच्या दृष्टीने सकारात्मक आहे. 

प्रश्‍न ः भारतीय अर्थव्यवस्थेसमोर सध्या काय आव्हाने आहेत? 
अर्थव्यवस्थेसमोर बरीच आव्हाने आहेत. ‘एनडीए’चे सरकार पहिल्यांदा सत्तेत आले तेव्हा आव्हाने वेगळी होती. त्या वेळी अर्थव्यस्थेला ‘ट्रॅक’वर आणणे गरजेचे होते आणि आता ‘एनबीएफसी’चे आरोग्य सुधरविणे आणि बॅंकिंग प्रणाली मजबूत करून अर्थव्यस्थेला चालना दिली पाहिजे. ‘लिक्विडीटी’ टिकवून ठेवणे, हे सध्याच्या घडीचे मोठे आव्हान आहे. ‘जीडीपी’वर लक्ष केंद्रित करून शेती क्षेत्र, रोजगारनिर्मिती आणि खासगी गुंतवणुकीला चालना देण्याची आणखी गरज आहे. 

प्रश्‍न ः इक्विटी आणि डेट मार्केटच्या दृष्टिकोनातून येता काळ आपण कसा बघता?

नजीकच्या काळात ‘फिक्‍स्ड इन्कम’ आणि ‘इक्विटी’मध्ये चढ-उतार राहण्याची शक्‍यता आहे. अर्थव्यवस्था भविष्यात कशी कामगिरी करेल, याचा विचार बाजार करीत असतो आणि माझ्या मते देशाचे भविष्य खूप उज्ज्वल आहे. भारत ही जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून, यापुढेही वाढीचा वेग असाच राहणार आहे. रिझर्व्ह बॅंकेने महागाई नियंत्रणात ठेवली आहे. सरकारी योजना अर्थव्यस्थेला ‘बूस्ट’ देणाऱ्या आहेत. या सर्वांचा परिणाम बाजारावर होत असल्याने बाजार येत्या काळात सकारात्मक आणि चांगला परतावा देईल, अशी आशा आहे. 

प्रश्‍न ः लोकसभेची निवडणूक आणि त्यामुळे थोडी निर्माण झालेली अस्थिरता यामुळे म्युच्युअल फंडातील ओघ जरा आटला होता. काय सांगाल त्याबद्दल? 

येत्या काळात म्युच्युअल फंड इंडस्ट्री सर्वाधिक वेगाने वाढणार आहे. आज दोन कोटी गुंतवणूकदार गुंतवणूक करीत आहेत. त्यांची संख्या लवकरच दहा कोटींवर जाणार आहे. त्यामुळे इतक्‍या मोठ्या गुंतवणुकीने अर्थव्यवस्थेला बळ मिळणार आहे. 

प्रश्‍न ः सामान्य गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीची काय ‘स्ट्रॅटेजी’ ठेवायला हवी? 

गुंतवणूकदारांनी उद्दिष्टानुसार गुंतवणूक करणे आवश्‍यक आहे. दररोजच्या घटनांमुळे बाजारात तात्पुरत्या स्वरूपात चढ-उतार होत असतात. मात्र, बाजारातील तात्पुरत्या घटनांकडे दुर्लक्ष करायला हवे. बाजार पडला म्हणून गुंतवणूक थांबवणे किंवा आपली गुंतवणूक घटली म्हणून ती काढून घेणे चुकीचे आहे. गुंतवणूक करताना मी आणखी गोष्ट सुचवेन, की घरातील गुंतवणुकीचे निर्णय गृहिणींना घेऊ द्या. कारण बऱ्याचशा महिला जी आई असेल, बहीण असेल किंवा बायको, त्यांना तुम्ही घरखर्चाला पैसे दिले तर दिलेल्या पैशात त्या सर्व खर्च भागवतात. त्या खऱ्या अर्थाने ‘फंड मॅनेजर’ असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com