‘पतंजली’ची उत्पादने ऑनलाइन 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 17 जानेवारी 2018

नवी दिल्ली - वार्षिक ५० हजार कोटींच्या उत्पादनक्षमतेचा पल्ला गाठणाऱ्या पतंजली उद्योगसमूहाची उत्पादने आता घरबसल्या ऑनलाइन मिळू शकणार आहेत, अशी अधिकृत घोषणा योगगुरू रामदेवबाबा यांनी आज केली. पतंजलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळकृष्ण या वेळी उपस्थित होते. ‘हरिद्वार से हर द्वार तक’ या ‘कॅचलाइन’सह ‘पतंजली’ने ई कॉमर्स क्षेत्रात उडी घेतली आहे. ऑनलाइन सेवेद्वारे दररोज १० लाख ग्राहकांपर्यंत पोचण्याचा उद्देश असल्याचे रामदेव यांनी सांगितले. 

पतंजलीच्या उत्पादनांवर कोणताही ऑनलाइन सूट न देता ती आहे त्याच किमतीला विकण्याचे वचन या साऱ्यांनी दिल्याचे रामदेव बाबा म्हणाले. देशातील किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात शंभर टक्के थेट परकी गुंतवणुकीला (एफडीजीआय) मान्यता मिळण्याची काहीही शक्‍यता नसल्याचे सांगतानाच रामदेव यांनी, ‘मी आताच कोणताही राजकीय वाद ओढवून घेऊ इच्छित नाही त्यामुळे यावर आता काही बोलणार नाही,’ असे सूचकपणे सांगितले.

‘‘पतंजलीच्या माध्यमातून फेब्रुवारीपर्यंत आणखी २० हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. तयार कपडे उद्योगातही पुढील वर्षापर्यंत पतंजली उडी घेईल. आगामी दोन वर्षांत एक लाख कोटी रुपयांचे उत्पादन लक्ष्य आम्ही निश्‍चितपणे गाठू व संपूर्ण देशात भारतीय आयुर्वेदाचा व उत्पादनवांचा गौरव वाढवू,’’ असेही रामदेव बाबा म्हणाले. दिल्लीत आज झालेल्या या कार्यक्रमाला ‘पेटीएम’चे संस्थापक विजय शेखर शर्मा, ‘पेटीएम मॉल’चे सीईओ अमित सिन्हा, बिग बास्केटचे संस्थापक हरी मेनन, ‘फ्लिपकार्ट’चे अध्यक्ष कल्याण कृष्णमूर्ती, ‘ग्रोफोर्स’चे संस्थापक सौरभ कुमार, ॲमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष मनीष तिवारी, ‘नेटमेड’चे प्रदीप दाढा, वन-एमजीचे प्रशांत टंडन, ‘शॉप क्‍लूज’चे संजय सेठी, एचडीएफसी बॅंकेच्या ई-कॉमर्स विभागप्रमुख स्मिता भगत आदी उपस्थित होते.

नागपूरला संत्राप्रक्रिया उद्योग
हरिद्वार व जयपूरपाठोपाठ नोएडा, इंदूर व नागपूरच्या मिहान प्रकल्पातील पतंजलीच्या कारखान्यास लवकरच प्रारंभ होणार असल्याचे रामदेवबाबा म्हणाले. यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यास मोठी मदत होईल, असे नमूद करताना त्यांनी सांगितले, की नागपूर येथील संत्राप्रक्रिया उद्योगाबरोबरच निर्यात केंद्रही सुरू होणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news Patanjali product